प्रतिनिधी / सांगली
जिल्हय़ात रविवारी घेण्यात आलेल्या स्वॅब तपासणीमध्ये आजपर्यंत सर्वाधिक विक्रमी असे 25 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्हय़ातील कोरोनाचा फैलाव पुन्हा एकदा वेगाने वाढू लागल्याचे समोर येत चालले आहे. जिल्हय़ातील एकूण रूग्णसंख्या 247 झाली आहे. तर आठ जण कोरोनामुक्त झाले आहेत. उपचारातील रूग्णसंख्या 114 आहे. मणदूरमध्ये समूह संसर्ग झाल्याने याठिकाणाहून रविवारी दहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
जिल्हय़ात 25 रूग्ण वाढले
जिल्हय़ात रविवारी एकदम 25 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये समूह संसर्ग पसरलेल्या शिराळा तालुक्यातील मणदूर गावामध्ये दहा रूग्ण वाढले आहेत. आजपर्यंत या मणदूरमध्ये 46 रूग्ण झाले आहेत. रविवारी वाढलेल्या रूग्णामध्ये 38 वर्षाची व्यक्ती, 25 वर्षाची व्यक्ती, 45 वर्षाची महिला, 23 वर्षाची महिला, 45 वर्षाची महिला, 50 वर्षाची महिला, 25 वर्षाची महिला, 15 वर्षाची मुलगी, 35 वर्षाची व्यक्ती, 11 वर्षाचा मुलगा यांचा समावेश आहे. तर खानापूर तालुक्यातील भाळवणी येथील 57 वर्षाचा पुरूष आणि 53 वर्षाची महिला आहे. जत तालुक्यातील अंकले येथील 66 आणि 56 वर्षीय व्यक्ती, कवठेमहांकाळ येथील 55 वर्षाची व्यक्ती,पलूस तालुक्यातील दुधोंडी येथील 79 वर्षाच्या दोन व्यक्ती, तासगाव तालुक्यातील मांजर्डे येथील 45 वर्षाची व्यक्ती, गव्हाण येथील 50 वर्षाची महिला, इस्लामपूर येथील 42 वर्षाची व्यक्ती, वाळवा तालुक्यातील येलूर येथील 45 वर्षाची महिला, फाळकेवाडी येथील 47 वर्षीय महिला आणि वाटेगाव येथील 50 वर्षाचा व्यक्ती, शिराळा तालुक्यातील किनरेवाडी 75 वर्षाची महिला, मिरज तालुक्यातील बुधगाव येथील 27 वर्षीय युवक असे एकूण 25 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या सर्वांच्यावर मिरजेच्या कोरोना रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
आठजण कोरोनामुक्त
जिल्हय़ात रविवारी चार जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामध्ये शिराळा तालुक्यातील रिळे येथील 57 वर्षीय व्यक्ती, मालेवाडी येथील 58 वर्षाची व्यक्ती, मणदूर येथील 75 वर्षीय महिला, काळोखेवाडी येथील 40 वर्षाची महिला, कवठेमहांकाळ तालुक्यातील कदमवाडी येथील 38 वर्षीय महिला, खानापूर तालुक्यातील साळशिंगे येथील 55 वर्षीय महिला, तासगाव येथील 58 वर्षाची महिला, आणि आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथील 18 वर्षाचा युवक असे आठ जण आज कोरोनाचा उपचार घेऊन बरे झाले आहेत. त्यांना आता संस्था क्वारंटाईन करण्यात आले आहे.
चौघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू
सध्या उपचारात असणाऱया रूग्णांपैकी खानापूर तालुक्यातील साळशिंगे येथील 60 वर्षीय व्यक्ती, कवठेमहांकाळ तालुक्यातील कदमवाडी येथील 50 वर्षीय महिला, विटा-हनुमंतनगर येथील 34 वर्षीय व्यक्ती आणि कडेगाव तालुक्यातील वांगी येथील 69 वर्षीय व्यक्ती यांची प्रकृती मात्र अद्यापही चिंताजनक आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
कोरोनाची जिल्हय़ातील स्थिती
एकूण रूग्ण 247
बरे झालेले 125
उपचारात 114
मयत 08