मनपात केवळ परप्रांतियांसाठी सुविधा, ऊन्हात नागरीकांची होत आहे परवड
बेळगाव
परप्रांतियांना स्वगृही जाण्यासाठी सुरू करण्यात आलेली अर्ज भरणा प्रक्रिया शुक्रवारी पुन्हा बंद पडली. याठिकाणी केवळ परप्रांतियांचे अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र जिल्हाअंतर्गत स्थलांतरासाठी अर्ज करण्यासाठी नागरिक महापालिकेकडे धाव घेत आहेत. त्यामुळे महापालिका कार्यालयात नागरीकांची गर्दी होत आहे.
तालुक्मयांतर्गत परवानगी देण्याची जबाबदारी तहशीलदारांकडे सोपविण्यात आली आहे. जिल्हाअंतर्गत प्रवासासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून परवानगी घ्यावी लागत आहे. परराज्यात जाण्यासाठी ऑनलाईन किंवा महापालिका कार्यालयात अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे परप्रांतिय नागरीकांची गर्दी महापालिकेत होत आहे. अशातच ऑनलाईन सुविधा वारंवार बंद पडत असल्याने अर्ज भरण्याची प्रक्रिया रखडत आहे. गुरूवारी दिवसभर अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरळीतपणे चालली होती. पण शुक्रवारी सर्व्हर डाऊन झाल्याने अर्ज भरण्याचे काम रखडले आहे. अशातच जिल्हाअंतर्गत व तालुकांतर्गत परवानगीसाठी नागरीक महापालिका कार्यालयाकडे धाव घेत आहेत. त्यामुळे नागरीकांची गैरसोय होत आहे. सर्वच नागरीकांना महापालिकेकडे पाठविण्यात येत असल्याने नागरीकांची धावपळ होत आहे. व्यवस्थित माहिती देण्यात येत नसल्याने कोरोनाच्या धास्तीने व लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या नागरिकांची परवानगीसाठी ससेहोलपट होत आहे. महापालिका कार्यालयात आलेल्या नागरीकांना पुन्हा जिल्हाधिकारी किंवा पोलीस आयुक्त कार्यालयाकडे जाण्याची सूचना करण्यात येत आहे. त्यामुळे नागरीकांना रिकाम्या हाती परतावे लागत आहे. सध्या परिवहन सुविधा बंद आहेत. अशातच उन्हाचा तडाखा वाढला आहे. अशा परिस्थितीत परवानगीसाठी नागरिकांना इकडून तिकडे पाठविण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे नागरीकांना परवानगी देण्याची सुविधा सुलभ करावी, अशी मागणी होत आहे.