तिसरे रेल्वेगेटचे काम लवकर करण्याच्या सूचना
प्रतिनिधी /बेळगाव
टिळकवाडी येथील तिसरे रेल्वेगेटचे काम अनेक महिन्यांपासून रखडले आहे. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून काम पूर्ण होण्यास विलंब होत असल्याने बुधवारी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ व मनपा आयुक्त रुदेश घाळी यांनी रेल्वे ओव्हरब्रिजच्या कामाची पाहणी केली. काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना कंत्राटदारांना देण्यात आल्या.
तिसरे रेल्वेगेटच्या कामाला सुरुवात होऊन अनेक दिवस उलटले तरी अद्याप ओव्हरब्रिजचे काम पूर्ण झालेले नाही. अनेकवेळा डेडलाईन देण्यात आल्या. परंतु काम मात्र रखडलेलेच होते. रेल्वे ओव्हरब्रिजचे काम सुरू असल्याने याचा फटका प्रवाशांना बसत आहे. सकाळ व संध्याकाळच्यावेळी वाहतूक कोंडीने नागरिक हैराण होत आहेत. दररोज या समस्येचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. काम रखडल्याने आजूबाजूच्या व्यापारीवर्गालाही फटका बसत आहे. त्यामुळे काम वेळेत पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
विविध संघटनांकडून काम वेळेत पूर्ण होण्याबाबत जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले होते. याची दखल घेत बुधवारी जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांनी संयुक्तरित्या ओव्हरब्रिजच्या कामाची पाहणी करून आढावा घेतला. कंत्राटदारालाही वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱयांनी केल्या आहेत.