प्रतिनिधी / सातारा :
जिल्हा कारागृहात एका कैद्याने शनिवारी हातातील बेडी काढून टायलेट साफ करण्याच्या ब्रशने ट्यूबलाईट फोडली. तसेच खोलीच्या दरवाज्यावर चढून सीसीटीव्ही फोडून शासकीय मालमत्तेचे नुकसान केले. त्याला कैदी व पोलिसांनी अटकाव करण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्यांना धक्काबुक्की केली. यामुळे त्याच्या विरूद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
विकास भिमराव बैले(वय 30, रा. कुशी ता पाटण) असे त्याचे नाव आहे. शुक्रवारी जिल्हा कारागृहातील दोन कैद्यांमध्ये झोपण्याच्या कारणावरून हाणामारी झाली. यात एक कैदी जखमी झाला होता. याप्रकरणी विकास बैले या कैद्याविरूद्ध शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल झाला. त्यानंतर बैले याने शनिवारी दि. 2 रोजी 2.20 वाजण्याच्या सुमारास हातातील बेडी काढली. आणि टॉयलेट साफ करणाऱ्या ब्रशने टयुबलाईट फोडली. खोलीच्या दरवाज्यावर चढून त्याने सीसीटीव्ही फोडून शासकीय मालमत्तेचे नुकसान केले. ही बाब करागृहातील इतर कैदी व पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर त्याला अटकाव करण्याचा प्रयत्न करण्यात आला. म्हणून त्याने धक्काबुक्की केली. त्याने केलेल्या या गैरवर्तनामुळे त्याच्याविरूद्ध शहर पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप मोरे करत आहेत.