नऊ महिन्यांनी नऊ नोव्हेंबरला होतेय सभा
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
चालू वर्षातील 2020-21 च्या मंजूर जिल्हा वार्षिक आराखडय़ातील 170 कोटी रुपये एवढा शंभर टक्के निधी उपलब्ध झाला आहे. येत्या 9 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता जिल्हा नियोजनची सभा आयोजित करण्यात आली असून या सभेत कामाचा आढावा आणि नव्या कामांना मंजुरी देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली. दरम्यान, नऊ महिन्यानंतर सभा होणार असल्याने ही सभा वादळी ठरण्याची शक्मयता आहे.
2020-21 वर्षाकरिता सिंधुदुर्ग जिल्हय़ाचा जिल्हा वार्षिक आराखडा 250 कोटीचा तयार करण्यात आला होता. या आराखडय़ाला राज्य शासनाच्या अर्थ व नियोजन विभागाने कात्री लावत 170 कोटीच्या आराखडय़ाला मंजुरी दिली होती. या आराखडय़ातून सुरुवातीला कोविड-19 उपायोजनांवर खर्च करण्यासाठी 17 कोटी, त्यानंतर 22 कोटी असा एकूण 39 कोटी रुपये एवढा म्हणजेच 23 टक्के निधी उपलब्ध झाला होता. त्यानंतर उर्वरित 131 कोटीचाही निधी आजच सोमवारी उपलब्ध झाला. त्यामुळे जिल्हा वार्षिक आराखडय़ातील 170 कोटी रुपये एवढा सर्वच्या सर्व शंभर टक्के निधी उपलब्ध झाला आहे.
जिल्हा वार्षिक आराखडय़ाचा निधी शंभर टक्के उपलब्ध झाल्याने आता कोविड व्यतिरिक्त अन्य विकासकामे मार्गी लागणार आहेत. त्या दृष्टीने पूर्वीच्या कामांचा आढावा घेऊन दायित्व म्हणून निधी वितरित करणे, नव्या कामांना मंजुरी देणे, जिल्हा परिषदेमार्फत पाठविण्यात आलेल्या विकासकामांना मंजुरी देणे व खर्चाचा आढावा घेण्यासाठी येत्या 9 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली नव्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हा नियोजनची सभा आयोजित करण्यात आली आहे.
नऊ महिन्यानंतर होणार सभा
जिल्हा नियोजनची मागची सभा 28 जानेवारी 2021 रोजी झाली होती. त्यानंतर आता तब्बल नऊ महिन्यांनी सभा होणार आहे. कोरोनामुळे सभा घेता आली नव्हती. परंतु, विकासकामे मार्गी लागावी, आगामी जानेवारी-फेब्रुवारी 2022 मध्ये जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका होणार असल्याने जिल्हा नियोजनची सभा घेऊन विकासकामांना मंजुरी देण्याची मागणी सातत्याने विरोधी पक्षातील भाजपचे नियोजन समिती सदस्य करत होते. अखेर 9 नोव्हेंबरला जिल्हा नियोजन सभा आयोजित करण्यात आली आहे. ही सभा 9 महिन्यानंतर होत असल्याने जि. प. मार्फत पाठविण्यात आलेल्या विकासकामांच्या मंजुरीवरून व विविध विषयांवरून सभा वादळी होण्याची शक्मयता आहे.