लवकरच होणार अधिकृत घोषणा, मतमोजणी 14 डिसेंबर रोजी
प्रतिनिधी/ पणजी
राज्यातील जिल्हा पंचायत निवडणुकीचे मतदान 12 डिसेंबर रोजी होणार असून 14 डिसेंबर रोजी मतमोजणी होईल. राज्य निवडणूक आयोगाने अशा आशयाचा निर्णय घेतलेला असून त्याची अधिकृत घोषणा होणे शिल्लक आहे.
कोविडच्या वाढत्या प्रभावामुळे मार्चमध्ये होणार असलेल्या निवडणुकाचा प्रचार संपता संपताच राज्य सरकारवर आलेल्या प्रचंड दबावामुळे राज्यातील जिल्हा पंचायत निवडणुकीचे केवळ मतदान बेमुदत पुढे ढकलण्यात आले होते. आता राज्यातील परिस्थितीत कमालीची सुधारणा झालेली असल्याने जिल्हा पंचायत निवडणुका घेण्यासाठी सरकारवर दबाव वाढत चाललेला आहे.
मुक्तिदिन षष्टय़ब्दीमुळे मतदान लवकर
अलिकडेच भाजपच्या गाभा समितीची महत्वाची बैठक झाली, ज्यामध्ये राज्यातील जिल्हा पंचायतीच्या निवडणुका 19 डिसेंबरपूर्वी घेण्याचे ठरविण्यात आले. तत्पूर्वी भाजपने 31 डिसेंबरपर्यंत जिल्हा पंचायत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे ठरविले होते. गोवा राज्याला 60 वर्षे पूर्ण होत असल्याने त्यानिमित्त राज्य पातळीवर भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे ठरविल्याने जिल्हा पंचायत निवडणुका त्या अगोदर घेण्यात याव्यात अशी सूचना राज्य निवडणूक आयोगाला करण्यात आली, त्यानुसार निवडणूक आयोगाने 12 डिसेंबर रोजी मतदान घेऊन दि. 14 डिसेंबर रोजी मतमोजणी हाती घेण्याचे ठरविले आहे.
कोराना काळातील पहिलीच निवडणूक
कोरोना सुरू झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होणार असल्याने या निवडणुकीत सामाजिक अंतर राखले जाणार आहे. त्यासाठी निवडणूक प्रक्रिया देखील वेगळ्या पद्धतीने राबविली जाईल. मतमोजणीसाठी बराच कालावधी लागण्याचीही शक्यता आहे.
पुन्हा प्रचाराला मिळणार तीन ते चार दिवस
निवडणूक मतदानाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु राज्य निवडणूक आयोग 12 डिसेंबर रोजी निवडणूक घेण्यास राजी झाल्याचे वृत्त हाती आले आहे. निवडणूक प्रचारासाठी उमेदवारांना 3 ते 4 दिवस दिले जातील. दरम्यान, सत्ताधारी भाजपने राज्यात सर्वत्र जोरदार प्रचार सुरू केलेला आहे. प्रत्येक मतदारसंघात सभा घेतल्या जात आहेत. त्याचबरोबर 50 ही मतदारसंघात भाजपने प्रत्येक 1 याप्रमाणे 50 निरीक्षकांची नियुक्ती केल्याची माहिती प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी दिली.