खासदार श्रीनिवास पाटील : स्वच्छ सुंदर शाळेतील पुरस्कारार्थी शाळेचा पुरस्कार वितरण सोहळा
प्रतिनिधी / सातारा
सातारा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये स्वच्छतेची आवड निर्माण व्हावी म्हणून आयोजित करण्यात आलेली स्पर्धा खरोखरच चांगली आहे. आमच्या लहानपणी आम्ही शाळेत जायचो तेव्हा आमचं गुरुजी आम्हाला झाडायला लावायचे. आम्ही मुलं त्यावेळी शाळा सारवून काढायचो. आता हे बक्षीस घेतलेल्या शाळांचे कार्य वाखाणण्याजोगे असे आहे. या शाळांचा परिसर त्यांनी चकचकीत ठेवला असावा, असे गौरवोद्गार खासदार श्रीनिवास पाटील यांनी काढले.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छ सुंदर शाळेच्या पुरस्कारार्थी शाळांचा गौरव येथील स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, माजी कृषी सभापती मनोज पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, शिक्षणाधिकारी शबनम मुजावर-मुलाणी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्यावतीने राबवण्यात येणाऱया उपक्रमाबाबत मी ऐकतो आणि वाचतो आहे. आमचे शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे आणि शिक्षणाधिकाऱयांनी चांगले उपक्रम हाती घेतले आहेत. कोरोना काळातही मुलांना शिकता कसे येईल हे त्यांनी पाहिले आहे. गोरगरीबांची मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत असतात. आपल्या काही शिक्षकांनी अशा मुलांना घरी जावून शिक्षण दिले आहे. त्यांचे करावे एवढे कौतुक कमीच आहे. आपला परिसर आपली शाळा स्वच्छ असेल तर शिक्षणाची आवड निर्माण होते. वातावरण प्रसन्न राहते. त्यामुळे हा उपक्रम दिशादर्शक असा आहे. ज्या शाळांनी काम केले. बक्षीस मिळाले आहे. त्या शाळांचे काम ऐवढय़ावर थांबले असे नाही तर इतर शाळांना त्यांच्यापासून प्रेरणा मिळावी म्हणून हा त्यांचा गौरव आहे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे नेटके नियोजन शिक्षणाधिकारी शबनम मुजावर मुलाणी यांनी पदभार स्वीकारताच त्यांनी शिक्षण विभागात अनेक बदल केले आहेत. दर्जेदार शिक्षण कसे मुलांना देता येईल त्या दृष्टीने अभ्यासपूर्ण असा आराखडा तयार केला आहे. हाही कौतुक सोहळा त्याचाच एक भग होता. त्यांनी केलेल्या नेटक्या नियोजनामुळै कार्यक्रमही यशस्वीपणे पार पडला.