ग्रुपने वर्गणी काढून वात्सल्य फाउंडेशनला दिले ऑक्सीजन मशीन भेट
प्रतिनिधी/ सातारा
सातारा जिह्यातील कोरोनाबाधित व्यक्तींच्या मृत्यूंच्या संख्येत घट व्हावी, ऑक्सिजन मशीन अभावी कोणाचाही मृत्यू होऊ नये, या उदात्त हेतूने सातारा जिल्हा परिषद मैदान ग्रुपने वर्गणी काढून येथील वात्सल्य फाउंडेशनला एक ऑक्सीजन मशीन भेट देऊन सामाजिक बांधिलकी जपली.
सातारा जिल्हा परिषद मॉर्निंग ग्रुपमध्ये एकूण 20 जणांचा समावेश असून हे सर्वजण सकाळी मैदानावर फिरायला आल्यानंतर त्यांच्यामध्ये सातारा शहरासह जिह्यातील कोरोनाच्या प्रादुर्भावावर, ऑक्सीजन मशीन अभावी कोरोनाबाधीत व्यक्तींचा होणारा मृत्यू यावर चर्चा होत असे. कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी विविध उपयोजना करण्यासह सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणार्या सातारा येथील वात्सल्य फाउंडेशनला ऑक्सीजन मशीन भेट देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
मशीनमुळे आणखी काही जणांचे प्राण वाचतील हा एकच हेतू होता. ग्रुपच्यावतीने गुरुवारी फाउंडेशनचे अध्यक्ष शशिकांत पवार यांच्याकडे ऑक्सीजनचे मशीन सुपूर्त करण्यात आले.यावेळी जयराम चव्हाण, अजितकुमार खामकर, हेमंतकुमार खाडे, सुनील जाधव, अविनाश कुर्लेकर, मच्छिंद्र जाधव, सागर ओसवाल, सुनील गायकवाड, सुनील त्रिबके, सुधीर चव्हाण, विजय वाघ, प्रियंक जाधव, शीतलकुमार बोबडे, राजमाने, देसाई आदी उपस्थित होते.