प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हा परिषदेत सत्तांतर विषय समिती सभापती निवडीत कोणताही धोका नको म्हणून आघाडीचे सर्व सदस्यांना शुक्रवारी गोवा सहलीवर जात आहेत. दरम्यान अध्यक्ष बजरंग पाटील यांच्या निवासस्थानी मंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांच्यात शुक्रवारी दुपारी बैठक होणार आहे. दरम्यान गुरूवारी रात्री उशीरापर्यंत अध्यक्ष बजरंग पाटील यांच्या दालनात उपाध्यक्ष सतीश पाटील, पक्षप्रतोद उमेश आपटे, माजी उपाध्यक्ष शशीकांत खोत यांच्यासह ज्येष्ठ सदस्यांची सभापती निवडीबाबत चर्चा झाली. चार विषय समित्यांपैकी तीन शिवसेनेला, तर एक ’स्वाभिमानी’ला देण्याचा निर्णयापर्यंत चर्चा आल्याचे समजते.
’स्वाभिमानी’च्या पद्माराणी पाटील यांना महिला बालकल्याण सभापती निश्चित मानली जाते. मात्र त्यांनी शिक्षण सभापतीपद हवे आहे. शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील यांच्या गटाचे सदस्य हंबीरराव पाटील यांना बांधकाम समिती देण्याची शक्यता आहे. आमदार प्रकाश आबिटकर आणि माजी आमदार चंद्रदीप नरके, उल्हास पाटील, सुजीत मिणचेकर यांच्या गटाच्या सदस्यांनाही पदाची शक्यता आहे. त्यामुळे या सर्वांपैकी प्रथम संधी कोणाला याबाबत रस्सीखेच सुरू आहे.