शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांचे शिवसैनिकांना आवाहन, करवीर, कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील पदाधिकाऱ्यांची बैठक
प्रतिनिधी/कोल्हापूर
अगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा. यासाठी पदाधिकारी, विभागप्रमुख यांनी आत्तापासूनच मतदार संघाचा आढावा घ्यावा. आरक्षण कोणते पडणार याचा अभ्यास करुन त्यादृष्टीने उमेदवार उभा करण्याची तयारी करा. प्रत्येक मतदार संघात शिवसेनेचा उमेदवार असलाच पाहिजे, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केले.
करवीर आणि कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुक संदर्भात शासकीय विश्रामगृह येथे बैठक झाली. बैठकीध्ये मार्गदर्शन करताना जिल्हाप्रमुख संजय पवार बोलत होते.
पवार म्हणाले, महाविकास आघाडी म्हणून एकत्र येताना शिवसैनिकांचा विचार होत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी त्यांच्या पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांची वाट बघू नका, शिवसैनिकांनीही जिल्ह्यात शिवसेना अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करावेत. ग्रामीण भागात विकास सोसायटी, दूध संस्थांच्या माध्यमातून शिवसेनेचे जाळे विस्तृत करण्याचा प्रयत्न करा. जि.प., प.स. निवडणुकीत उमेदवारांबाबत मातोश्रीवरुन निर्णय होतील. त्यामुळे महाविकास आघाडीची वाट बघू नका. अगामी सर्व निवडणुक स्वतंत्रपणे लढून शिवसेनेचे अस्तित्व दाखवून द्यायचे आहे. यासाठी इच्छूकांनी निवडणुकीची तयारी करावी. जिल्हाप्रमुख म्हणून तुमच्या खांद्याला खांदा लावून निवडणुकीच्या रिंगणात उतरु, असा विश्वास पवार यांनी दिला.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण म्हणाले, राज्यात मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे. त्यामुळे शिवसैनिकांना मानसन्मान मिळाला पाहिजे. जिल्हÎात सेनेचा एक मंत्री, दोन खासदार, एक आमदार असतानाही शिवसैनिकांना निधीसाठी दूसऱयांच्या दारात जायला लागते, हे दूर्भाग्य असल्याचे चव्हाण म्हणाले.
बैठकीला सरदार मिसाळ, सतीश कुरणे, चंद्रकांत पाटील, संजय पाटील, मोहन पाटील, इंद्रजीत पाटील, संजय जाधव, दीपक पाटील, युवासेना जिल्हाध्यक्ष मंजित माने, करवीर तालुका प्रमुख विराज पाटील आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.
शिवसेना नेते दिवाकर रावते घेणार आढावा
शिवसेना नेते दिवाकर रावते आणि संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर लवकरच कोल्हापूर दौऱयावर येणार आहेत. यावेळी ते जिल्हा परिषदेच्या मतदार संघात जावून उमेदवारांचा आढावा घेणार आहेत. त्यामुळे इच्छूकांनी तयारी करावी, असे आवाहन पवार यांनी केले.
जिल्हा बँकेला दोन जागा द्या, अन्यथा स्वतंत्र लढु
जिल्हा बँकेला नऊ जागांपैकी दोन जागा शिवसेनेला मिळाल्याच पाहिजे. यासाठी दोन्ही खासदारांनी आग्रही भुमिका घ्यावी. जर कोणी शिवसेनेला कमी लेखत असेल तर त्यांना सेनेचे अस्तित्व दाखवून देवू. जागा देणार नसाल तर सेनेची स्वतंत्र लढण्याची तयारी असल्याचेही पवार यांनी सांगितले.