कोल्हापूर / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर आता 20 जानेवारीला अध्यक्ष निवड होणार आहे. जिल्हा बँकेच्या मुख्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी अरुण काकडे यांच्या अध्यतेखाली निवड प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे अध्यक्ष पदासाठी इच्छूक नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.
जिल्हा बँकेच्या कठीण काळात ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी अध्यक्ष पदाची धुरा सांभाळली. ढोल, ताशांच्या गजरात थकबाकीदाराच्या दारात जाऊन अनोख्या पद्धतीने कर्जवसुली केली. त्यामुळेच 31 मार्च 2021 या अर्थिक वर्षाअखेर बँकेच्या सर्व म्हणजे 191 शाखा नफ्यात आहेत. तसेच बँकेचा ऑडिट वर्ग सतत ‘अ’ असतो. गेल्या दोन वर्षाच्या कोरोना महामारीच्या काळातही शेतकऱ्यांना विनाविलंब पिक कर्ज पुरवठा व मध्यम मुदत कर्ज पुरवठा केला. त्यामुळे ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांच्या बँकेला उर्जितावस्था दिल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता बँक सुस्थितीत असताना पुन्हा मंत्री मुश्रीफ अध्यक्ष होणार अशी चर्चा होती. पण मंत्रालयीन कामाचा भार असल्यामुळे जिल्हा बँकेचे अध्यक्ष पद निभावणे कठीण असल्याचे चार दिवसांपूर्वी मुश्रीफ यांनी स्पष्ट केले आहे.
अध्यक्ष पदासाठी मुश्रीफ यांनी दिलेल्या नकारानंतर संचालक पदासाठी राष्ट्रवादीच्या गोटातील इतर नावांची चर्चा सुरु झाली आहे. राष्ट्रवादीच्या संचालकांचे संख्याबळ आठ असल्यामुळे अध्यक्ष पदावर त्यांचा दावा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटातील इतर संचालकांची नावे अध्यक्ष पदासाठी चर्चेत आली आहेत. पण जिल्हा बँकेचे नेतृत्व हे नेहमी जिह्याच्या नेत्याकडे असते. एखाद्या तालुक्याचे नेतृत्व करणाऱया नेत्याला ही जबाबदारी पेलू शकत नसल्याचा इतिहास आहे. त्यामुळेच अखेरच्या टप्प्यात अध्यक्ष पदासाठी पुन्हा मंत्री मुश्रीफ यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. अध्यक्ष पदासाठी काँग्रेसकडून पी.एन.पाटील यांचे नाव चर्चेत असले तरी राष्ट्रवादीकडून अध्यक्ष पदाचा मान काँग्रेसला दिला जाण्याची शक्यता कमी आहे.