कराड तालुक्यातील कार्यकर्त्यांची मागणी
प्रतिनिधी/ कराड
सातारा जिह्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची ठराव गोळा करण्याची प्रक्रिया पूर्ण होऊन कच्ची मतदार यादी 12 मार्चला प्रसिध्द होणार आहे. राज्यात अग्रेसर असणारी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आज प्रगतीपथावर आहे. या बँकेची निवडणूक लवकरच होणार असून या निवडणुकीत पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे बंधू जयंतकाका पाटील यांना संधी द्यावी, अशी मागणी कराड तालुक्यातील कार्यकर्त्यांनी केली आहे.
जयंतकाका पाटील यांना यावेळी संधी मिळायलाच हवी, अशी अनेक कार्यकर्त्यांची तीव्र भावना आहे. जयंतकाका पाटील हे सातारा जिह्यातील अग्रेसर असणाऱया श्री गजानन हाऊसिंग सोसायटीचे गेली 2008 वर्षापासून आजअखेर चेअरमन आहेत. तसेच श्री. शिवाजी शिक्षण संस्था ट्रस्टचे या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, श्री. जोतिर्लिंग विकास सेवा सोसायटीचे चेअरमन, आदरणीय यशवंतरावजी चव्हाण पतसंस्थेचे संस्थापक, मलकापूर येथील यशवंत चरिटेबल ट्रस्टचे संस्थापक म्हणून काम पहात आहेत.
विविध संस्थांच्या माध्यमातून सहकार, शिक्षण क्षेत्रात जयंत काका पाटील हे उल्लेखनीय काम करीत आहेत. तसेच बँकेच्या उज्ज्वल प्रगतीमध्ये जिह्यातील अनेक कारखान्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामध्ये सहकार पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचा सिंहाचा वाटा आहे. त्याचप्रमाणे बँकेच्या भरीव प्रगतीमध्ये कराड तालुक्याचे मोठे योगदान आहे. या सर्व बाबींचा विचार करता जयंतकाका पाटील यांना संधी मिळायलाच हवी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.