सातारा / प्रतिनिधी :
जिल्हा रुग्णालयाच्या आवारात दोन मुलींसह एक महिला रुग्णांच्या नातेवाइकांना कधी गोडी गुलाबीने तर कधी धमकावून वेश्या व्यवसाय करत होत्या. पोलिसांनी त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. वेश्या व्यवसाय करणाऱ्या आणखी दोन मुलींचा वावर या रुग्णालयाच्या परिसरात असल्याची माहिती समोर येत असून, त्यांचाही शोध सुरु आहे.
त्याबाबत मिळालेली माहिती अशी, जिल्हा रुग्णालयाच्या आवारात सुरक्षा रक्षक पृथ्वीराज गायकवाड, वसीम मुलाणी हे गस्त घालत असताना रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास लसीकरणासाठी उभारण्यात आलेल्या मंडपाच्या आडोशाला एक पुरुष व महिला अश्लील चाळे करीत असताना आढळून आले. सुरक्षा रक्षकांनी त्यांना हटकले असता ते दोघे पळून जाऊ लागले. मात्र गायकवाड आणि मुलाणी यांनी त्यांचा पाठलाग करून त्यांच्याकडे विचारपूस केली असता ती महिला वेश्या व्यवसाय करीत असल्याचे निष्पन्न झाले. विशेष म्हणजे या व्यवसायात त्या महिलेला तिच्या दोन मुली सहकार्य करत असल्याची बाब पुढे आली. संबंधित महिलेची चौकशी केल्यानंतर तिच्या समवेत असणाऱ्या पुरुषाला जिल्हा रुग्णालयाच्या पोलीस चौकीत घेऊन जाण्यात आले. त्या ठिकाणी त्यांची चौकशी करून पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली.