प्रतिनिधी/ सातारा
येथील सातारा जिल्हा ग्रामीण रुग्णालयाच्या बाहेर आपल्या विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी (चतुर्थ श्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघ, महाराष्ट्र जिल्हा शाखा सातारा यांच्यावतीने जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रलंबित मागण्यासाठी आज बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात आले. आंदोलनात श्रीमती सुरेखा चव्हाण, विष्णु नलावडे, चंद्रकांत जाधव, प्रकाश घाडगे यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते.
तत्पूर्वी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, सातारा जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या अदिनस्त कार्यरत असलेल्या प्रलंबित मागण्यांसाठी वेळोवेळी निवेदन देऊन आंदोलन करून सुद्धा मागण्या सोडण्याबाबत खोटी आश्वासने देऊन संघटनेची व वरिष्ठांची दिशाभूल केली जात आहे. ऑगस्ट 2020 मध्ये जिल्हा शासकीय कार्यालयासमोर कर्मचाऱयांनी आंदोलनाची भूमिका घेतली असता यावेळी आपण संघटना प्रतिनिधींबरोबर चर्चा करून कोरोना सारख्या अडचणीच्या काळात आपण आंदोलन करू नका, असे आम्हाला सांगितले गेल्याने दिलेल्या सूचनांचे पालन करून आम्ही आंदोलन मागे घेतले होते. त्यानंतर वेळोवेळी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याशी संघटना प्रतिनिधींनी चर्चा केली असता, त्यांनीही मागण्यांबाबत खोटी आश्वासने दिली. त्यामुळे आज आम्हाला आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागत आहे.
वर्ग 4 चे कालबद्ध पदोन्नतीचे 10, 20, 30 लाभ मिळावा, सेवानिवृत्त कर्मचारी यांची देय रक्कम देऊन निवृत्तिवेतन सातव्या आयोगाच्या फरकासह त्यांना देण्यात यावे, वर्ग-4 कर्मचाऱयांना पदोन्नती देण्यात यावी, भविष्य निर्वाह निधी हिशोब अद्यावत ठेवण्यात यावा वर्ग 4 चे दरमहाचे वेतन दरमहा एक तारखेला मिळावे, अनुकंपाच्या निवडणूका तात्काळ कराव्यात, कंत्राटी कर्मचाऱयांच्या पगारात वाढ व्हावी आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.