वैभव नाईक यांनी जिल्हा रुग्णालयात आरोग्य व्यवस्थेचा घेतला आढावा
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
आमदार वैभव नाईक यांनी सोमवारी जिल्हा रुग्णालयात भेट देऊन आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. कोविड रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये म्हणून सिंधुदुर्ग जिल्हय़ासाठी शासनाने मंजूर केलेला दुसरा ऑक्सिजन प्लांट सुरू करण्याबाबत आमदार नाईक यांनी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अपर्णा गावकर यांच्यासमवेत चर्चा केली. लवकरात लवकर हा ऑक्सिजन प्लांट सुरू केला जाईल, असे डॉ. गावकर यांनी सांगितले.
यावेळी आमदार नाईक यांनी कोविड रुग्णांना दिल्या जाणाऱया सुविधा, जेवण, पाणी, रेमडेसिवीर इंजेक्शनची उपलब्धता, कोविड सेंटरमधील सुविधा, विलगीकरण व्यवस्था, ऑक्सिजन सुविधा, कोविड लसीचा पुरवठा याबाबत डॉ. गावकर यांच्याकडून माहिती घेत आढावा घेतला. वाढत्या कोविड रुग्णांच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने आवश्यक सूचना आमदार नाईक यांनी केल्या. यावेळी जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शाम पाटील, फार्मासिस्ट अनिल देसाई व आरोग्य विभागातील अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.