‘भंडारा’ पुनरावृत्ती होता-होता वाचली, धुराचे पसरले साम्राज्य
बाळ-बाळंतिणींना काढले बाहेर, परिचारिकेचे प्रसंगावधान
प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालाच्या प्रसुतीपश्चात विभाग 2 मध्ये गुरूवारी पहाटे 5:30 च्या सुमारास अचानक स्फोट झाला. या घटनेने बाथरुमधून धुराचे प्रचंड लोण पसरल्याने कर्मचारी व रूग्णांच्या नातेवाईकांची धावाधाव सुरू झाली. परिचारिकेने दाखवलेल्या समयसूचकतेमुळे केवळ दैव बलवत्तर म्हणून जिल्ह्यात भंडारासारखी घटना होता होता टळली.
या घटनेमुळे सुदैवाने कोणताही अनर्थ घडला नसला तरी जिल्हा शासकीय रूग्णालयाचा भेंगळ कारभार समोर आला आहे. गिझरचा स्फोट झाल्या त्यावेळी १ महिला बाथरूममध्ये अडकली होती. यामुळे कर्मचाऱ्यांना नक्की काय करावे यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. यावेळी कार्यरत परिचारिकेने बाथरुममध्ये जात या महिलेला सुखरुप बाहेर काढले. या घटनेने जिल्हा रूग्णालय रूग्णांच्या सुरक्षेप्रति निष्काळजी असल्याचेच दिसून येत आह़े
जिल्हा रूग्णालयाच्या प्रसुतीगृहामध्ये नव्याने सिझर झालेल्या महिला, गरोदर महिला, नवजात बालके ठेवण्यात आली होत़ी गुरूवारी सकाळी 5 च्या सुमारास महिला आंघोळीस बाथरूमध्ये गेली होती. यावेळी अचानक गिझरचा स्फोट झाला. नुकतेच सिझर झालेल्या माहिलांना जागेवरून उठणे देखील अवघड झाल्याने त्याना बाहेर कसे काढायचे, असा प्रश्न निर्माण झाला. काही महिलांना व्हील चेअरवरुन बाहेर आणण्यात आले.
अखेर रूग्णांच्या नातेवाईकांनी धावाधाव करत महिलांना व नवजात बाळांना सुरक्षित बाहेर काढले. त्यामुळे सुदैवाने कोणताही अनर्थ घडला नाही. जिल्हा शासकीय रूग्णालयात जिल्हाभराच्या ग्रामीण भागातून गरोदर माता येत असतात. मोफत मिळणाऱ्या या सुविधांमुळे गोरगरिब जनतेसाठी हे रूग्णालय अधार ठरत असते. मात्र गुरूवारी जिल्हा रूग्णालयाच्या हलगर्जीपणाची हद्द झाल्याचे पुन्हा एकदा दिसून आले.
भंडाराची पुनरावृत्ती होता-होता वाचली
जिल्हा रूग्णालयाच्या प्रसुतीपश्चात विभाग 2 मध्ये गिझरच्या स्फोटामुळे गरोदर माता व बाळांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाह़ी मात्र भंडारा येथे धुरामुळे झालेल्या जीवितहानीनंतर जिल्हा रूग्णालयाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला होता. तसेच राज्यांच्या मंत्र्यांकडून देखील रूग्णालयाला भेट देत अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले होते. मात्र गुरूवारी सकाळी घडलेल्या घटनेने रूग्णालयातील रूग्णांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आह़े
नुकतेच करण्यात आले होते स्ट्रक्चरल ऑडिट
जिल्हा रुग्णालयाचे स्ट्रक्चरल ऑडिट खासगी कंपनीच्या मार्फत पूर्ण करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक संघमित्रा फुले यांनी दोनच दिवसांपूर्वी ‘तरुण भारत’शी बोलताना दिली. मात्र रूग्णालाच्या प्रसुतीपश्चात विभागातील गिझरचा झालेल्या स्फोटामुळे या स्ट्रक्चरल ऑडिटवर देखील प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. नक्की ऑडिट झाले की राजकीय दबावापोटी घाईघाईने उरकण्यात आले, असा सवालही या घटनेमुळे उपस्थित होत आहे.