प्रतिनिधी / सातारा :
सातारा जिल्हा रूग्णालयात दिवसभरात हजारो रूग्ण संपूर्ण जिल्हय़ातुन दाखल होतात. या रूग्णांना प्रत्येक वेळी संबंधित आजारावर उपचार करून घेण्याकरीता केसपेपर काढणे बंधनकारक असते. प्रत्येकवेळी नुतन केस पेपर काढणे व त्या केसपेपरचे मेंटनंस करणे हे मोठे जिकरीचे होत होते. तसेच अनेकदा रूग्णांना केसपेपर काढण्याकरीता लागणाऱया वेळेमुळे उपचाराकरीता विलंब होत होता. पण आता या केसपेपरचे डिजिटलायझेशन झाले असून आयुष्यभरासाठी एकच केसपेपर क्रमांक लागणार आहे.
जिल्हा रूग्णालयामध्ये केसपेपर विभागाचे संगणीकरण करण्यात आले असून या विभागात तीन संगणकांसह अन्य अद्यावत यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना संगणीकृत केसपेपर मिळणार असुन याअंतर्गत केसपेपर (युनिकोड) क्रमांक हा आयुष्यभरासाठी एकच असणार आहे. यापुर्वी उपचाराकरीता दाखल होणाऱया रूग्णांना जुना केसपेपर शोधण्याकरीता तासंतास रांगेत थांबावे लागत होते. पण आता या डिजिटलायझेशन मुळेस सगळेच काही सोयीस्कर होणार आहे.
सध्या रूग्णालयातील या विभागातर्फे नागरिकांची माहिती अपलोड करण्याचे कार्य सुरू आहे. त्यामुळे अनेकांना संगणकीय प्रक्रियेत केसपेपर मिळण्यास विलंब होत आहे. पण येत्या काही दिवसांत ही माहिती अपलोड करून पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर रूग्णालयात ऑफलाईन केसपेपर देण्याची ही सुविधा सुरूच ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आता जिल्हा रूग्णालयात उपचाराकरीता दाखल होणाऱया रूग्णांचा केसपेपरसाठी होणारा विलंब हा वाचणार आहे.