पालकमंत्र्यांची माहिती : स्वतंत्र समितीमार्फत चौकशी करून अहवाल देणार – जिल्हाधिकारी
प्रतिनिधी / कणकवली:
डिझेलला पैसे नसल्याने कोरोना चाचणीसाठी घेतलेले 152 स्वॅब येथील उपजिल्हा रुग्णालयात पडून असल्याबाबतचे वृत्त ‘तरुण भारत’मध्ये प्रसिद्ध होताच पालकमंत्री उदय सामंत यांनी गंभीर दखल घेतली. या प्रकाराला प्रथमदर्शनी जिल्हा शल्यचिकित्सकांचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचे दिसून येत आहे. आपण जिल्हाधिकाऱयांना तातडीने जबाबदारी निश्चित करून कारवाईचा अहवाल आरोग्यमंत्र्यांना पाठविण्याच्या सूचना दिल्याचे सामंत यांनी सांगितले.
दरम्यान, याबाबत जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याशी संपर्क साधला असता, याबाबत पालकमंत्र्यांशी बोलणे झाले आहे. मी जिल्हा शल्यचिकित्सकांशी याबाबत बोलले आहे. या प्रकरणी स्वतंत्र समितीमार्फत चौकशी करून पुढील कार्यवाहीसाठीचा अहवाल पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले.
उपजिल्हा रुग्णालयाचे डिझेलसाठीचे 1 लाख 60 हजार रुपयांचे बिल प्रलंबित होते. यापैकी काही दिवसांपूर्वी 60 हजारांचे बिल अदा करण्यात आले. मात्र, त्यानंतर पुन्हा डिझेल देण्यात आले. त्यानंतर पुन्हा सुमारे 1 लाख 30 हजार रुपयांपर्यंत डिझेलचे देणे पोहोचले. त्यामुळे पंपावरून उधारीवर डिझेल देण्यास नकार देण्यात आल्याने गुरुवार व शुक्रवारी उपजिल्हा रुग्णालयातून कोरोना चाचणीसाठी घेण्यात आलेले स्वॅब पडून होते. याबाबत माहिती घेत विचारणा केल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सकांनी सुरुवातीला आपल्याला याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगून स्वॅब दररोज पाठविण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. मात्र, त्यांना वस्तुस्थितीची जाणीव करून दिल्यानंतर तसेच उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱयांनी आपल्या स्तरावर व उपसंचालक स्तरावर पाठपुरावा केल्याबाबतची कल्पना दिल्यानंतर त्यांनी डिझेलसाठी पैसे उपलब्ध नसल्याचे सांगितले होते.
दरम्यान, याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच पालकमंत्री उदय सामंत यांनी गंभीर दखल घेतली आहे. प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना ते म्हणाले, स्वॅब एक दिवस गेले नाहीत किंवा चार दिवस गेले नाहीत, हा प्रश्न नसून ते न पाठविणे हे चुकीचे आहे. या प्रकरणाची मी प्राथमिक माहिती घेतली असता जिल्हा शल्य चिकित्सकांचा निष्काळजीपणा दिसून येत आहे. याबाबत आपण जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याशी बोललो आहे. सदर बातमीच्या अनुषंगाने या प्रकाराची सखोल चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याबाबत तातडीने सखोल चौकशी करून यात ज्यांचा दोष असेल, जे जबाबदार असतील, त्यांच्यावर कारवाईचा अहवाल आरोग्यमंत्र्यांकडे पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच आपण स्वत:ही आरोग्यमंत्र्यांशी बोलून पुढील कार्यवाही करणार असल्याचे सांगितले.
निधीअभावी रुग्णालय समस्यांच्या गर्तेत
कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सी. एम. शिकलगार यांच्यासह त्यांची टीम चांगले काम करत असली तरीही शल्य चिकित्सक आणि उपसंचालक पातळीवरून आवश्यक सुविधांसाठी निधी उपलब्ध करून दिला जात नसल्याचे दिसून येते. तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक कै. डॉ. सहदेव पाटील हेदेखील याबाबत सातत्याने सांगत होते. अनेक सुविधा येथे उपलब्ध करण्यास अडचण येत आहे. उपजिल्हा रुग्णालयाकडून स्वत:च्या खिशातून डिझेल खर्च करून सातत्याने पाठपुरावा करूनही पैसे आले नाहीत. उपजिल्हा रुग्णालयाचे जानेवारी 2020 पासूनचे सुमारे 14 लाखांचे वीजबिल थकित आहे. त्यापैकी केवळ दोन लाख रुपये प्राप्त झाल्याचे समजते.