आमदार नीतेश राणे यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी केल्याची माहिती : स्वॅब घेतल्यानंतर नर्सला क्वारंटाईन करण्याची होती गरज
लहान मुलांच्या वॉर्डमध्ये त्या नर्सला काम दिलेच कसे? : जिल्हा रुग्णालयात हे सारे कुणाच्या मर्जीने सुरू आहे!
वार्ताहर / कणकवली:
जिल्हा रुग्णालयातील नर्सचा स्वॅब नमुना घेतल्यानंतर तिला क्वारंटाईन करण्याची गरज असताना जिल्हा शल्य चिकित्सकांनी त्या नर्सला रुग्णालयातील लहान मुलांच्या वॉर्डमध्ये डय़ुटी दिली. ज्यावेळी त्या नर्सचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला, तेव्हा ती नर्स त्या लहान मुलांच्या वॉर्डमध्येच काम करत होती. हा प्रकार धक्कादायक असून या प्रकरणाची गांभिर्याने दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांची तातडीने चौकशी करून त्यांची बदली करावी, अशी मागणी आमदार नीतेश राणे यांनी केली.
येथील न. पं.च्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत राणे बोलत होते. उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड, गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक बंडू हर्णे, अभिजीत मुसळे आदी उपस्थित होते.
त्या मुलांसह पालकांचे आरोग्यही धोक्यात!
राणे म्हणाले, जिल्हा रुग्णालयाचा सध्या सुरू असलेला कारभार लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी की लोकांना मारण्यासाठी आहे, असा सवाल राणे यांनी केला. आरोग्य विभागाच्या ज्या डॉक्टर, नर्सनी आपले आयुष्य धोक्यात घालून कोरोना विरोधात सेवा केली, त्यांच्या आरोग्याची काळजी जिल्हा शल्य चिकित्सकांना घ्यायला जमत नाही. त्या नर्समुळे रुग्णालयातील ती लहान मुले व त्यांच्या पालकांचेही आरोग्य धोक्यात आले आहे. ज्या लहान मुलांच्या वॉर्डात ती नर्स काम करीत होती, तेथे 1 ते 10 वर्षांपर्यंतची मुले आहेत. ही सर्व त्या नर्सच्या संपर्कात आलेली असल्याने या मुलांबाबत शासनाने तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे करण्यात आली आहे. या बाबत मुख्यमंत्र्यांनाही पत्र देण्यात येणार आहे.
या गंभीर प्रकाराला जबाबदार कोण?
58 वर्षांच्या देवगडातील ज्या महिलेचे कोरोनामुळे निधन झाले, त्यांना सेवा देण्यासाठी ज्या दोन नर्स जिल्हा रुग्णालयात होत्या, त्या आजही रुग्णालयातच काम करत आहेत. त्यामुळे हे सारे कुणाच्या मर्जीने सुरू आहे? हे सारे सुरू असताना त्या शल्य चिकित्सकांना कुणीच थांबविणार नाही का? असा सवाल राणे यांनी केला. ज्यावेळी त्या नर्सचा स्वॅब घेण्यात आला, त्यानंतर तिला क्वारंटाईन करण्याची गरज होती. तिच्यामुळे कोरोनाचा संसर्ग जर त्या लहान मुलांना व त्यांच्या पालकांना झाला, तर या गंभीर प्रकाराला जबाबदार कोण? लहान मुले व 60 वर्षांवरील व्यक्तींना कोरोनाच्या संसर्गाचा धोका सर्वाधिक असल्याचे तज्ञांनी सांगितले असताना जिल्हा प्रशासनाची ही चूक भरून कशी काढणार, असा सवाल राणे यांनी केला.
सर्व लहान मुलांचे स्वॅब घ्या!
ज्या लहान मुलांच्या वॉर्डमध्ये ती नर्स कार्यरत होती, तेथील सर्व लहान मुलांना तात्काळ विलगीकरण कक्षात ठेवून त्यांचे स्वॅब नमुने घ्यावे व उपचार सुरू करा. त्या नर्सच्या संपर्कात रुग्णालयातील अजून दोन नर्स आल्या असून त्यांचीही स्वॅब टेस्ट करा, अशी मागणी राणे यांनी केली.