प्रतिनिधी / सिंधुदुर्ग:
महिला कर्मचाऱयाशी गैरवर्तन केल्याप्रकरणी गुन्हा व अटकेची कारवाई झालेले सिंधुदुर्गचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत हरिभाऊ चव्हाण यांच्यावर गुरुवारी अखेर अधिकृत निलंबनाची कारवाई करण्यात आली. सार्वजनिक आरोग्य मंत्रालयातील कार्यासन अधिकाऱयांचे रितसर पत्र जिल्हा रुग्णालय प्रशासनाला प्राप्त झाले आहे. पुढील आदेश येईपर्यंत सध्याचे प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्याकडेच हा कार्यभार राहणार असल्याचे निर्देशित करण्यात आले आहे.
डॉ. चव्हाण यांना अधिकृतपणे सेवेतून निलंबित करण्यात आले. याबाबत सार्वजनिक आरोग्य मंत्रालयातून निघालेले लेखी आदेश जिल्हा रुग्णालय प्रशासनाला प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. दरम्यान पुढील आदेश येईपर्यंत सध्याचे प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील हेच या पदाचा कार्यभार सांभाळणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.
महिला कर्मचाऱयाबरोबर गैरवर्तन केल्याप्रकरणी डॉ. चव्हाण यांच्यावर भा. दं. वि. कलम 354, 354 (अ) व 506 अन्वये 22 मार्च रोजी ओरोस पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. डॉ. चव्हाण 48 तासापेक्षा अधिक काळ पोलीस कोठडीत राहिल्यामुळे राज्यपाल, महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अतिल) नियम 1979 मधील नियम 4 (2) (अ) च्या तरतुदीनुसार 7 एप्रिल रोजी त्यांना झालेल्या अटकेच्या दिवसापासून निलंबित घोषित करण्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाकडून पुढील आदेश काढले जाईपर्यंत ते निलंबित राहाणार आहेत. या आदेशाबरोबर आणखी असाही आदेश काढण्यात आला आहे की, या निलंबनाच्या कालावधीत सामान्य रुग्णालय, औरंगाबाद येथे त्यांना हजर राहायचे असून तेथील सक्षम अधिकाऱयांच्या पूर्व परवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही.