विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सूचना
कोल्हापूर/प्रतिनिधी
जिल्ह्यात कोरोनामृत्यू दर ३ टक्क्यांवर पोचला आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण टक्केवारी वाढत आहे ती कमी होण्यासाठी आरोग्य यंत्रणेने अधिक सक्षम पणे काम करावे अशी सूचना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दुपारी सीपीआर हॉस्पिटल ला भेट दिली. प्रारंभी त्यांनी दुध गंगा बिल्डिंग मधील ऑक्सिजन बेड असलेल्या विभागाची पाहणी केल्यानंतर आयसीयू अतिदक्षता विभाग, एनआयसीयु विभाग आणि जम्बो ऑक्सिजन टॅंक ला भेट दिली. त्यानंतर राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता कार्यालयात त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीला भाजपचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अधिष्ठाता डॉक्टर चंद्रकांत म्हस्के, आपत्ती व्यवस्थापन चे समन्वयक संजय शिंदे आदी उपस्थित होते.
अधिष्ठाता डॉ. मस्के म्हणाले शिरोळमध्ये सध्या 300 ऑक्सिजन बेड आहेत. सध्या 400 रुग्ण उपचार घेत आहेत. उपलब्ध वैद्यकी स्टाप चांगली सेवा देत आहे. कमी वेळेत हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन टॅंक उभारला गेला त्यासाठी भूलतज्ञ विभाग प्रमुख डॉक्टर उल्हास मिसाळ यांचे मोठे सहकार्य लाभले त्यामुळे लवकरात लवकर रुग्णांना याची सुविधा मिळाली आहे.
विरोधी पक्षनेते फडणवीस म्हणाले जिल्ह्यात मृत्यू दर वाढत आहे. त्यादृष्टीने काय उपाययोजना केल्या आहेत. काही कमी आहे का ? औषध पुरवठा होतंय का? वैद्यकीय स्टाफ किती आहे ? असे प्रश्न करत त्यांनी धोरणाचा आढावा घेतला. तसेच कोरोना दर वाढीचा दर कमी करण्यासाठी यंत्रणेने अधिक सक्षम पणे काम करावे असे त्यांनी स्पष्ट केले.