जिल्हा नियोजनच्या बैठकीत निर्णय : पालकमंत्री जयंत पाटील यांची माहिती
प्रतिनिधी / सांगली
जिल्हा वार्षिक योजना 2021-22 च्या 442 कोटी 88 लाखाच्या प्रारूप आराखड्यास पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेचा आराखडा 358 कोटी 9 लाखाचा असून विशेष घटक कार्यक्रम आराखडा 83 कोटी 81 लाखाचा आहे. आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील आराखडा 98 लाखाचा आहे. 2021-22 साठी शासनाने दिलेल्या वित्तीय मर्यादेत केलेला प्रारूप आराखडा 315 कोटी 62 लाखाचा आहे. अतिरिक्त मागणी 127 कोटी 26 लाखाची आहे. बैठकीत जिल्हा वार्षिक योजनेच्या 2020-21 च्या 37 कोटी 8 लाख रुपयांच्या पुनर्विनियोजन प्रस्तावासही मान्यता देण्यात आली. दरम्यान, गतवर्षाच्या आराखड्यातील फक्त 19 टक्केच निधी खर्च झाला असून मार्चअखेर उर्वरित निधी खर्च करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या.
2020-21 मध्ये जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत झालेल्या 18 जानेवारी 2021 अखेरच्या खर्चाचा आढावा घेतला. सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत 285 कोटी मंजूर नियतव्यय असून 18 जानेवारी 2021 अखेर यामध्ये 34 कोटी 37 लाख रूपये खर्च झाला आहे. विशेष घटक अंतर्गत 83 कोटी 81 लाख रूपये मंजूर नियतव्यय असून यामधील 36 कोटी 70 लाख रूपये खर्च झाला आहे. आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत 98 लाख रुपये मंजूर आहे. असा एकूण 369 कोटी 79 लाख रूपये मंजूर नियतव्यय असून एकूण 71 कोटी 7 लाख रूपयांचा निधी खर्च झाला आहे. मंजूर नियतव्ययाच्या तुलनतेत 19.22 टक्के निधी खर्च झाला असून उर्वरित निधी विहीत मुदतीत विकास कामांसाठी यंत्रणांनी खर्च करावा. विकास कामांसाठी प्राप्त झालेला निधी कोणत्याही स्थितीत अखर्चित राहणार नाही याची काटेकोरपणे दक्षता घेण्याचे आदेश पालकमंत्री पाटील यांनी दिले.
राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी पीक विमा ऐच्छिक करण्यात आला असून केंद्र सरकारने यामधील हिस्सा कमी केला आहे. त्यामुळे राज्य शासनावर त्याचा बोजा वाढणार आहे. याबाबत राज्यस्तरावर निर्णय घेण्यात येणार आहे. जतमध्ये मका खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी संबंधित विभागाच्या मंत्री महोदयांशी चर्चा सुरू असून याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महामार्ग रस्त्यांची गुणवत्ता तपासावी. जिह्यात होणाऱया राष्ट्रीय महामार्गाची गुणवत्ता तपासावा, अशी मागणी आमदार अरुणआण्णा लाड यांच्यासह काही लोकप्रतिनिधींनी केली. याबाबत सर्वच सदस्यांनी रस्त्यांची गुणवत्ता काही भागात राखली जात नसल्यांच्या तक्रारी करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या विषयांवर सविस्तर चर्चा… जत येथे मक्का खरेंदी केंद्र होणार गावठाण वाढीसाठी प्रस्तावावर निर्णय घेणार महावितरणकडील ट्रान्सफॉर्मर तातडीने बसवा मोबाईलवर रेकॉर्डिंग करताना झेडपी सदस्या पतींवर डॉ. कदम भडकले जिल्ह्यात 1013 शेतकऱ्यांना दोन दिवसात कृषिसाठी वीजपुरवठा डीआरडीच्या घरकुलाला गावठाण, गायरान जागांचा विचार |
चर्चेतील अन्य विषय
मिरज तालुक्यातील वारणा-कृष्णा काठावरील जमीन, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत कामे, पीक विमा, नागठाणे येथील बालगंधर्व स्मारक, हातनूर येथील ग्रामीण रूग्णालयाची जागा जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या नावे करणे, महापुरात खराब झालेल्या डी.पी. व पोलची दुरूस्ती आदींसह विविध विषयांवर चर्चा झाली.