जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहिमेत 94.40 टक्के जणांनी पहिला तर 79.75 टक्के जणांनी घेतला दुसरा डोस
सांगली / प्रतिनिधी
कोविड-19 लसीकरण मोहिमेत सांगली जिल्ह्यामध्ये दि. 15 फेब्रुवारी 2022 रोजी अखेर 18 वर्षावरील एकूण 21 लाख 80 हजार 800 लाभार्थींपैकी पहिला डोस 20 लाख 58 हजार 689 (94.40 टक्के), दुसरा डोस 17 लाख 39 हजार 262 (79.75 टक्के) तर बुस्टर डोस 32 हजार 116 जणांना दिला आहे. 15 ते 17 वर्ष वयोगटातील बालकांना त्यांच्या शाळेमध्ये जाऊन कोविड-19 लसीकरण करण्यास दि. 3 जानेवारी 2022 पासून सुरुवात करण्यात आली असून याअंतर्गत एकूण 1 लाख 44 हजार 617 लाभार्थींपैकी पहिला डोस 1 लाख 37 हजार 234 (94.89 टक्के), दुसरा डोस 93 हजार 506 (64.66 टक्के) बालकांना दिला आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांनी कोविड-19 लसीचे डोस घ्यावे, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
जिल्ह्यामधील 751 शाळांपैकी पहिल्या डोसकरीता 528 शाळा व दुसऱ्या डोस करीता 195 शाळा 100 टक्के पूर्ण झालेल्या आहेत. जिल्ह्यामध्ये कोविड-19 लसीकरण कामकाज जलद गतीने होण्याकरीता व लोकांचा प्रतिसाद जास्तीत जास्त मिळण्याकरीता कमी काम असलेल्या 90 गावांची निवड करून या गावांमध्ये विशेष मोहिम राबविण्यात आली होती. याअंतर्गत लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे 38 गावे कमी कामाच्या निकषातून पार पडली आहेत. उर्वरित 52 गावांमध्ये देखील लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून यामध्ये पहिल्या डोसमध्ये 6 गावे 100 टक्के पूर्ण झाली असून 28 गावांचे काम 80 टक्के पेक्षा जास्त व उर्वरित गावांचे काम हे 60 टक्के पेक्षा जास्त झाले आहे.
येत्या आठवड्यामध्ये या गावांमध्ये 100 टक्के लसीकरण काम पूर्ण होईल. सध्या रोज 20 हजारापेक्षा जास्त कोविड-19 लसीकरण होत आहे. येत्या एका आठवड्यात 15 ते 17 वर्ष वयोगटातील सर्व लाभार्थीना दुसरा डोस देण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे यांनी सांगितले.