सीपीआरसह नागरी आरोग्य केंद्रांवर संशयितांची तपासणीसाठी रांग
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात शहरासह ग्रामीण भागातही कोरोना रूग्ण दिसून येत आहेत. त्यामुळे कोरोना तपासणीसाठी नागरी आरोग्य केंदे, ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांत गर्दी होत आहे. शहरातील नागरी आरोग्य केंद्रांत एकीकडे लसीकरण आणि दुसरीकडे कोरोना रूग्ण तपासणी सुरू आहे. `आशांद्वारे ईली, सारीचा सर्वे सुरू आहे. संशयित रूग्ण दिसताच त्याची कोरोना तपासणी केली जात आहे.
शहरात गेल्या दोन दिवसांत कोरोना रूग्ण संख्या वाढली आहे. मंगळवारी शहर आणि परिसरात 32 नवे रूग्ण दिसून आले. ग्रामीण भागात 15 नवे रूग्ण दिसून आले. कोरोना तपासणीसाठी सीपीआर, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, पंचगंगा हॉस्पिटल आयसोलेशन हॉस्पिटल तसेच इचलकरंजीतील आयजीएम आणि गडहिंग्लज येथील उपजिल्हा रूग्णालयात कोरोना तपासणीसाठी बाह्यरूग्ण विभाग सुरू आहे. उपजिल्हा, सेवा, ग्रामीण रूग्णालयांसह 74 प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना ओपीडी सुरू आहे.
शहरात आयसोलेशन हॉस्पिटल, शिवाजी पेठेतील फिरंगाई हॉस्पिटल, पंचगंगा हॉस्पिटल आणि कसबा बावडा, महाडीक माळ, फुलेवाडी, सदर बाजार, सिद्धार्थनगर, मोरे माने नगर येथील कुटुंब कल्याण केंद्रांवर मोफत स्वॅब तपासणी सुरू आहे. कोरोना नियंत्रणात असतानाही येथे रूग्ण तपासणी होत होती. कोरोनाचा प्रार्दुभाव झाल्यानंतर तेथे तपासणीसाठी गर्दी होत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने आशांद्वारे इली, सारीचा सर्व्हे सुरू केला आहे. होम टू होम सर्वेक्षणात मंगळवारी 600 जणांची तपासणी करण्यात आली. कोरोना रूग्ण मिळालेल्या परिसरात त्याच्या संपर्कातील 20 जणांचे स्वॅब घेण्यात येत आहेत. संशयित लक्षणे असलेल्यांचे पुन्हा हायर व लोअर असे वर्गीकरण सुरू आहे.
शहरात महापालिकेतील आरोग्य कर्मचार्यांचे 60 टक्के लसीकरण पुर्ण झाले आहे. फ्रंटलाईन वर्कर्सचे 28 टक्के लसीकरण पुर्ण झाले आहे. जिल्ह्यात लसीकरणासाठी 34 हजार 967 आरोग्य कर्मचार्यांची नोंद झाली आहे. त्यापैकी 23 हजार 712 जणांनी लस घेतली आहे. ही टक्केवारी 68 टक्क्यांइतकी आहे. फ्रंटलाईन वर्कर्स, होमगार्ड, महसूल विभागातील अधिकारी, कर्मचार्यांपैकी 29 हजार 821 जणांनी नोंदणी आहे. त्यातील फक्त 4 हजार 965 जणांनी लस घेतली आहे. ही टक्केवारी 18 टक्के आहे. आजपर्यंत 64 हजार 788 पैकी 28 हजार 677 जणांनी लस घेतली आहे. जिल्ह्याची ही टक्केवारी 45 पर्यंत आहे, अशी माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली.
दरम्यान, कोरोना लसीकरण उद्दिष्टपुर्तीसाठी शुक्रवारपर्यंत डेटलाईन आहे. त्यामुळे फ्रंटलाईन वर्कर्स, आरोग्य कर्मचार्यांनी लसीकरणाला प्राधान्य दिले आहे. बुस्टर डोसही दिला जात आहे.