अचूक बातमी “तरुण भारत”ची, शनिवार, 22 मे 2021, सकाळी 11.00
● कोरोना संक्रमणाचा वेग कायम ● भरारी पथकांना हाती काहीच लागेना ● होम आयसोलेशनमधील रुग्णांनी नियम पाळावेत ● म्यूकरमायकोसिसच्या भितीने नुसतीच धडकी ● प्रशासनाचा बैठकांवर जोर
प्रतिनिधी / सातारा :
जिल्ह्यातील प्रमुख सातारा, कराड, म्हसवड, पाटण, वाई आदी आठ महत्वाच्या शहरामध्ये कोरोनाचा संक्रमणाचा वेग कायम आहे. ग्रामीण भागात तर नियम बासनात गुंडाळून ठेवूनच सर्रास दळणवळण सुरु आहे. कोरोना बाधितांवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाकडून नुसत्याच बैठकांचे सत्र सुरु आहे. डिस्चार्ज होणाऱ्यांची संख्या मोठी असली तरी होम आयसोलेशनमध्येच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मोठे आहे. हॉस्पिटलमध्ये खचाखच रुग्णांची गर्दी असल्याने रुग्णालयीन प्रशासनाकडून नेहमीच्या तुलनेत दुर्लक्ष होत आहे. त्यातच म्यूकरमायकोसिस या नव्या शब्दाने जिल्हावासियांची धडकी वाढवली गेली आहे. प्रशासनाकडून नेमण्यात आलेल्या भरारी पथकांच्या हाती मात्र काहीच लागेना झाले आहे. दि.21 रोजी 7869 तपासण्या झाल्या तर नव्याने जिल्ह्यात 1878 बाधित आढळून आले.
जिल्ह्यात बाधित आढळून येणाऱ्यांची संख्या पहाता व रोज कोरोना मुक्त झालेल्यांची संख्या पहाता बाधितांचा आकडा जास्त आहे. जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये संक्रमणाचा वेग काही केल्या कमी होत नाही. तीच परिस्थिती ग्रामीण भागात कायम आहे. ग्रामीण भागातही कोरोनाचा उद्रेक थांबता थांबेना. छोट्या छोटया वाडय़ावस्तीवरही एखादा दुसरा रुग्ण आढळून येत असल्याने गावेच्या गावे भयभीत होवून घराबाहेर फिरणे टाळत आहेत. तरीही कामानिमित्ताने बाहेर गेले तर कोरोनाची भिती आहेच. सातारा शहरातील एकही वॉर्ड असा नाही की तेथे कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे बाधित आढळून आले नाही. बाधित आढळून आल्याने अख्खी कुटुंबेच कुलूपबंद झाली आहेत. काही कुलूपाच्या आत तर काहीजण वेगवेगळय़ा रुग्णालयात उपचार घेताना पहायला मिळत आहे. कोरोनाची दाहकता काही केल्या कमी होत नाही. विशेष म्हणजे रुग्णालयांमध्ये सगळीकडेच गर्दीच गर्दी असल्याने तेथील वैद्यकीय व्यवस्थापनाला प्रत्येक रुग्णांकडे निटसे लक्ष देता येत नाही. त्यामुळे रुग्णालयाच मृत्यूचा दर वाढताना दिसत आहे. घरामध्ये जे डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहेत. त्यांचा कोरोना बरा होण्याचे प्रमाण चांगले आहे. कोरोनामुळे अनेकांची कुटुंबे अक्षरशः उजाड झाली आहेत. प्रशासनाकडून मृत्यूदर, बाधितांचा दर कमी आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरु आहेत.
शुक्रवारी दिवसभरात 7869 तपासण्या
काल दिवसभरात 7869 जणांचे स्वाब तपासणी करण्यात आले.त्यापैकी 1878 जण कोरोना बाधित आढळून आले असून पॉझिटिव्ह रेट 23.27एवढा आहे.त्यातील आरटीपीसीआर टेस्ट2442 झाल्या 782बाधित आले.खाजगीत 973 टेस्ट झाल्या त्यात282 जण बाधित आले.5427जणांची रॅट तपासणी झाली त्यात1096 जण बाधित आले.केआयएमएसमध्ये 112 जणांची तपासणी केली असून त्यात 44 जण बाधित तर डीएस सातारा येथे 1357 जणांची तपासणी केली त्यात 456 जण बाधित आढळून आले.
म्यूकरमायकोसिसची नावानेच धडकी
आधीच कोरोनाच्या दाहकतेत जिल्हा होरपळत आहे. त्यातच नव्याने जिल्ह्यात म्यूकरमायकोसिसचे रुग्ण आढळून येवू लागले आहेत. म्यूकरमायकोसिसच्या बाधित रुग्णांचे बळी जावू लागले आहेत. त्यामुळे त्या नावानेच धडकी भरु लागली आहे. प्रशासनाकडून प्रबोधन होत असले तरीही ते थिटे पडत आहे.
प्रशासनाच्या नियोजनाच्या जोर बैठका
कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासह जिह्याच्या विविध प्रांताधिकाऱ्यांकडून ज्या बैठका होत आहेत. त्या सोशल डिस्टन्स ठेवून होत आहेत का?, मत्रालय पातळीवरुन ऑनलाईन बैठकीचे निर्देश आहेत. असे असताना जिह्यात ऑफलाईन बैठका होत असल्याने अनेक अधिकाऱयांना दोन दोन डोस घेवूनही कोरोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आले आहे.
भरारी पथकांना काहीच हाती लागेना
कोरोना बाधित होण्याचा वेग कमी करण्यासाठी प्रशासनाच्यावतीने भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, ही भरारी पथके काही मोजक्याच गावात सक्रीय आहेत. इतर गावांमध्ये ही पथके नेमकी आहेत कुठे?, त्यांच्याकडून नेमकी काय कार्यवाही सुरु आहे हा संशोधनांचा विषय बनला आहे. गावागावामध्ये मात्र आता स्वतःहूनच काळजी घेताना चित्र दिसत आहे.
होम आयसोलेशनमधील रुग्णांनीच काळजी घ्यावी
जे होम आयसोलेशनमध्ये जे रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांच्याकडून काळजी घेणे महत्वाचे आहे. कारण घरात स्वतःला क्वारटाईन करुन घेतल्यानंतर दररोजची स्वच्छता करणे गरजेची आहे. सातारा शहरातील काही होम आयसोलेशनमधील रुग्णांच्या घराबाहेर कचऱयाचा ढिगारा तसाच पडून असतो. त्यांनी मागवलेल्या ऑनलाईन फुडच्या पिशव्या घराबाहेर तशाच टाकण्यात येतात. त्यामुळे मोकाट कुत्री ते खरकटय़ा पिशव्या, कचरा त्यातच रमतात आणि आणखी कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता निर्माण होत आहे. वास्तविक अशा कोरोना बाधित रुग्णांनी होम आयसोलेशनमध्ये उपचार घेताना स्वतसोबत आजुबाजूच्या परिसराची स्वच्छता राखणे महत्वाचे आहे, असा सुर उमटत आहे.
शनिवारपर्यंत नमुुने……672862, बाधित….146721, मुक्त…123770, मृत्यू….3359, उपचारार्थ….19588