अचूक बातमी “तरुण भारत”ची, सोमवार 9 ऑगस्ट 2021, दुपारी 4.15
●रविवारीची सुट्टी असूनही गेल्या 24 तासात 588 बाधित ●10 हजार 342 संशयितांच्या चाचण्या ●कराड, सातारा तालुक्यात रूग्णवाढ थांबेना ●दुपारी चारनंतरही रस्त्यांवर गर्दी कायम ●डेल्टाचे संकट पुण्याच्या वेशीवर
सातारा / प्रतिनिधी :
देशात कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या पुणे जिल्ह्यातील निर्बंध आता आणखी शिथील झाले असूून, पुण्यातील सुरू असलेले व्यवहार आता रात्री 8 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी मिळाली आहे. मात्र, पुण्याच्या शेजारी असलेल्या सातारा जिल्ह्यातील निर्बंध कायम असून रूग्णवाढही अपेक्षितपणे नियंत्रणात येईना. रविवारी शासकीय सुट्टी असल्यानंतर रूग्णवाढीचा आकडा खरे तर कमी येतो. मात्र सातारा जिल्ह्यात गेल्या 24 तासात 10 हजार 342 संशयितांच्या तपासण्या झाल्या असून 588 नवे बाधित आढळले आहेत.
पुणे अनलॉक, साताऱ्यात अंशतः लॉकडाऊन कायम
सातारा जिल्ह्यात रूग्णवाढीची पॉझिटिव्हीटी कधी 5 टक्क्यांवर येत आहे तर अचानक 9.5 च्या पुढे उसळी घेत आहे. ऑगस्ट महिन्याच्या सहा दिवसात पॉझिटिव्हीटी रेट कायमच कमी-जास्त होत राहिला असून, जिल्ह्यातील रूग्णवाढ काही केल्या 500 च्या खाली येईना. यात कराड तालुका अजुनही हॉटस्पॉट असून सातारा तालुक्यातील रूग्णवाढही गंभीर आहे. फलटण तालुक्याने या आठवड्यात दोनवेळा शंभरच्या आकड्याला गाठले आहे. कोरेगांव, खटाव तालुक्यातील रूग्णवाढीच्या आकड्याची उसळी अचानक चिंतेत टाकणारी आहे.
डेल्टाचे संकट आता रोखायला हवे
सातारा जिल्ह्यात रूग्णवाढीचा कहर कायम असतानाच शेजारच्या पुणे जिल्ह्यात कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचे 3 रूग्ण आढळले आहेत. तर राज्यात 45 रूग्ण आढळले आहेत. पुण्यात डेल्टाचे रूग्ण आढळल्याने सातारा जिल्हा प्रशासनाने आणखी अलर्ट होण्याची गरज आहे. राज्यातील अनेक जिल्हे दुसरया लाटेला रोखण्यात यशस्वी झाले तरी सातारा जिल्ह्यातील दुसरया लाटेचा मुक्काम चिंता वाढवणारा आहे.
रविवारी जिल्ह्यात मुक्त -777, तपासण्या – 10873, बाधित – 588, मृत – 20
रविवारपर्यत जिल्ह्यात एकूण नमूने 14,92,855, एकूण बाधित 2,25,279 घरी सोडण्यात आलेले 2,11, 447 मृत्यू 5453 उपचारार्थ रुग्ण-10,715