अचूक बातमी “तरूण भारत”ची, मंगळवार 1 मार्च 2022, सकाळी 10.30
● सहा तालुक्यात नव्याने एक जण बाधित
● महाबळेश्वर, पाटणमध्ये नवी रुग्णवाढ नाही
● कोरोना कालावधीनंतर महाशिवरात्रीला महादेव मंदिरं गजबजली
● सक्रिय रुग्णसंख्या सव्वाशेच्या आत
सातारा / प्रतिनिधी :
गेली दोन वर्षे कोरोना महामारीच्या संकटामुळे प्रशासनाने सर्वच धार्मिक स्थळे बंद केली होती. गतवर्षी महाशिवरात्रीला महादेव मंदिरे कुलूपबंद होती. यावर्षी मात्र, कोरोना कमी झाल्याने प्रशासनाने काहीसे निर्बंध शिथिल केलेले आहेत. त्यामुळे पहाटेपासून शंभु महादेवाच्या मंदिरात भाविकांची गर्दी दिसून येत होती. जिल्ह्यात मंगळवारी सकाळी जाहीर झालेल्या अहवालात 15 जण नव्याने बाधित आढळून आले तर 1हजार 6 जणांचे स्वॅब तपासणी करण्यात आले. जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 1.49वर आलेला आहे.
दोन तालुके निरंक
जिल्ह्यातील पॉझिटिव्हीटी 1.49 वर आली आहे. जिल्ह्यातील पाटण आणि महाबळेश्वर या दोन तालुक्यात नव्याने कोणीही बाधित आढळून आलेले नाही. सर्वच तालुक्याची वाटचाल कोरोना मुक्तीच्या दिशेने सुरू आहे. जिल्ह्यातील जावली तालुक्यात 1, कराड तालुक्यात 3, खंडाळा तालुक्यात 1, खटाव तालुक्यात 1, कोरेगाव तालुक्यात 1, माण तालुक्यात 1, फलटण तालुक्यात 2, सातारा तालुक्यात 4, वाई तालुक्यात 1 असे 15 जण बाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात सक्रिय रुग्ण सव्वाशेच्या आत असून त्यातील हॉस्पिटलमध्ये उपचार घेणारे हे 20 च्या आसपास आहेत.
महाशिवरात्रीला शंभु महादेव मंदिरात गर्दीचा सागर
गेली दोन वर्षे कोरोनामुळे कडक निर्बंध होते. त्यामुळे सर्व धार्मिक स्थळे कुलूप बंद होती. गत वर्षी महाशिवरात्रीला घरातूनच शिवभक्तांनी दर्शन घेत महाशिवरात्री साजरी केली होती. परंतु यावर्षी महाशिवरात्रीला नियम शिथिल असल्याने जिल्ह्यातील सर्वच महादेव मंदिरात गेले आठ दिवसापासून तयारी सुरू होती. भक्तांनी पहाटेपासून दर्शनासाठी गर्दी केली आहे. त्यात सातारा शहरातील कोटेश्वर, कृष्णेश्वर, बहुलेश्वर, राजेश्वर, विश्वेवर तसेच यवतेश्वर, पाटेश्वर, संगममाहुली येथील काशी विश्वेश्वर यासह सर्वच मंदिरात गर्दी झालेली होती. मंदिराच्यावतीने विविध उपक्रम आयोजित करण्यात आल्याने एक वेगळा उत्साह दिसत होता.
मंगळवारी
नमुने-1006
बाधित-15
मंगळवारपर्यंत
नमुने-25,52,858
बाधित-2,79,035
मृत्यू-6675
मुक्त-271528