अचूक बातमी “तरुण भारत” ची, बुधवार, 28 एप्रिल, दुपारी 12.30
● दीड हजाराच्या पुढे वाढ सुरूच ● बेड मिळवण्यासाठी रूग्णांची धावाधाव ● पुणे विभागात कोरोनामुक्ती 9 लाखावर ● सातारा जिल्ह्यात कोरोनामुक्ती 77 हजारावर ● 18 वर्षांवरील लसीकरण नोंदणीची प्रतिक्षा
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यात कोरोनाची रूग्णवाढ हजाराच्या आत आणण्याचे आव्हान प्रशासनापुढे असून गत दोन दिवसापासून टाळेबंदीची कडक अमलबजावणी करण्यात येत आहे. विनाकारण फिरणारांची वाहने जप्त करण्याबरोबरच त्यांची कोरोना टेस्ट करण्याची मोहिमही पोलिसांनी सुरू केली आहे. कराड, सातारासह शहरांच्या प्रवेशद्वारावर चेकपोस्ट करून प्रत्येक वाहन तपासले जात आहे. निर्बंधांच्या कडक अमलबजावणीमुळे दोन हजारी ओलांडलेला रूग्णांचा आकडा काही प्रमाणात कमी होत आहे. बुधवारी आलेल्या अहवालात 1810 नवे कोरोना रूग्ण जिल्ह्यात वाढले आहेत. बाधितांची वाढ दीड हजारांच्या पुढे सुरूच आहे. दरम्यान 18 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाची अधिकृत नोंदणी आज (बुधवारी) दुपारी 4 वाजल्यापासून सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या लसीकरणाच्या नियोजनाचेही आव्हान पेलण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांच्या बैठकांवर बैठका सुरू आहेत.
कोरोना टेस्टची कारवाई गरजेची
जिल्ह्यातील रूग्णवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासन कडक निर्बंधांची अमलबजावणी करताना दिसत आहे. कराड तालुक्यात कराड, ओगलेवाडी, मसूर यासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी विनाकारण फिरणारांची कोरोना टेस्ट करण्याची मोहिम पोलिसांनी सुरू केली आहे. आरोग्य विभागाचे पथक प्रत्येक चेकनाक्यावर तैनात करण्यात आले आहे. जे वाहनधारक योग्य कारण नसताना उगाचच फिरत आहेत अशांची चौकशी करून त्यांची जागेवरच कोरोना टेस्ट केली जात आहे. या मोहिमेमुळे विनाकारण फिरणारांना चाप बसेल असे बोलले जात आहे.
लसीकरण नोंदणी दुपारपासून
कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी 1 मे पासून 18 वर्षांवरील युवक व नागरिकांना कोरोना लस देण्यात येणार आहे त्याची नोंदणी आजपासून दुपारी चार वाजता सुरू होईल. आरोग्य सेतू ऍप आणि उमंग ऍपवर ही नोंदणी होणार आहे. 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी रजिस्ट्रेशनमध्ये स्पॉट नोंदणीची सुविधा पूर्वीप्रमाणेच राहील. 18 पेेक्षा अधिक वयाचे आहेत, त्यांच्यासाठी कोव्हिन पोर्टलवर नोंदणी गरजेची आहे. 18 ते 45 वर्षे वयोगटातील लोकांची श्रेणी मोठी आहे.पीआयबीने सरकारच्यावतीने नोंदणी प्रक्रियेची माहिती दिलीय. कोरोना लसीसाठी नोंदणी प्रक्रिया पूर्वीसारखीच आहे. आपणास लसीसाठी कोव्हिन पोर्टलवर (https://selfregmission.cowin.gov.in/) किंवा आरोग्य सेतू अॅपद्वारे नोंदणी करावी लागेल.
पुणे विभागात कोरोनामुक्ती 9 लाखावर
पुणे विभागातील 9 लाख 48 हजार 396 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 11 लाख 20 हजार 939 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 1 लाख 51 हजार 130 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 21 हजार 413 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 1.91 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 84.61 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
मंगळवारपर्यंत जिल्हय़ात एकूण बाधित 96,722, एकूण कोरोनामुक्त 77,026, एकूण बळी 2,388, एकूण उपचारार्थ 17,272
मंगळवारी जिल्हय़ात बाधित 1,666, कोरोनामुक्त 1,540, बळी 33