तब्बल वर्षभरानंतर झालेल्या जिल्हा नियोजन समितीची चर्चा गुलदस्त्यात
प्रतिनिधी/ सातारा
महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून पहिलीच जिल्हा नियोजन समितीची सभा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या उपस्थितीत पार पडली. या सभेत जिल्हा वार्षिक योजनेचा सन 2021-22 च्या 140 कोटींच्या वाढीव मागणीसह 485.90 कोटींच्या प्रारुप आराखडय़ास जिल्हा नियोजन समितीने मान्यता दिली. सभेत नेमके कोणत्या विभागाला टार्गेट केले, आतमध्ये कोणत्या कोणत्या नेत्यांनी कोणाला कोंडीत पकडले हे मात्र, पत्रकारांना प्रवेश न दिल्याने समजू शकले नाही.
जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात नियोजन समितीच्या सभेला वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार शशिकांत शिंदे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, आमदार जयकुमार गोरे, आमदार दीपक चव्हाण, आमदार महेश शिंदे, जिल्हाधिकारी शेखरसिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, उपवनंरक्षक भारतसिंह हाडा, जिल्हा नियोजन अधिकारी बी.जे. जगदाळे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे यांच्यासह विविध विभागांचे कार्यालय प्रमुख उपस्थित होते.
सन 2021-22 साठी राज्यस्तरीय समितीच्या शिफारशीसाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेसाठी 140 कोटींच्या वाढीव मागणीसह 404.49 कोटींची, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 79.83 कोटी तर आदिवासी क्षेत्र बाह्य उपयोजनेसाठी 1.58 कोटी इतक्या प्रारुप आराखडय़ास जिल्हा नियोजन समितीच्या वतीने मान्यता देण्यात आली. आयत्या वेळच्या विषयामध्ये उंब्रज (ता. कराड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धनाने ग्रामीण रुग्णालयात रुपांतर करणे, मारुल हवेली (ता. पाटण) व कोपर्डे हवेली (ता. कराड) येथे खास बाब म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मंजुरीसाठीचा प्रस्ताव, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्र बांधणे व विस्तारीकरण करण्याचा प्रस्ताव, बा. सी. मर्ढे यांच्या मर्ढे (ता. सातारा) या गावास क वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा मिळण्याचा प्रस्ताव, सिद्धेश्वर देवस्थान मारुल हवेली, वडजाई देवी देवस्थान वडजल (ता. माण), श्री जोम मल्लिकार्जुन देवालय वाघावळे (ता. महाबळेश्वर) या स्थळांना क वर्ग यात्रा स्थळांचा दर्जा देण्याबरोबर जिल्हा मार्ग विकास व मजबुतीकरण कामाबाबत तसेच सन 2019-20 च्या मंजुर आराखडय़ातील तांत्रिक मान्यता प्राप्त असलेली प्रास्तावित कामे व सन 2020-21 च्या आराखडय़ा बाहेरील कामे आराखडय़ात समाविष्ट करण्याबाबत सभागृहात सदस्यांसोबत चर्चा होऊन मान्यता देण्यात आली. तसेच विविध विभागांकडील 2020-21 जिल्हा वार्षिक योजनेमधील नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत प्राप्त झालेल्या प्रस्तावांवर सभागृहात चर्चा होऊन मान्यता देण्यात आली.
कोरोनाचे कारण अन् पत्रकारांना नो एन्ट्री कोरोनाचे कारण देत पत्रकारांना सभागृहात प्रवेश नव्हता. पत्रकार परिषदेत पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी अतिशय जुजबी माहिती दिली. त्यामुळे नेमक्या घडामोडी समजू शकल्या नाही. आमदार जयकुमार गोरे हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या विभागाला टार्गेट करतात. त्यांचे आणि रामराजेंचे जुळत नाहीत. या सभेत नेमके राजकीय खटके काय उडाले हे पत्रकारांच्यापर्यंत पोहचू शकले नाही. ही महाविकास आघाडीच्या काळातली पाहिली नियोजन सभा होती.