प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव जिल्हय़ातील आणखी नऊ जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रविवारी सिव्हिल हॉस्पिटलमधून घरी पाठविण्यात आले आहे. यामध्ये शहरातील मध्यवर्ती भागातील आझाद गल्ली येथील महिलेचाही समावेश आहे. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 65 वर पोहोचली आहे.
माहिती खात्याच्यावतीने यासंबंधीचा तपशील प्रसिद्धीला दिला असून रुग्ण क्रमांक 298, 418, 448, 484, 495, 496, 541, 542, 551 हे उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. यामध्ये चार लहान मुलांचाही समावेश आहे.
आझाद गल्ली येथील महिला, कुडची येथील दोघे जण, हिरेबागेवाडी व संकेश्वर येथील प्रत्येकी तीन जणांना रविवारी विलगीकरण कक्षातून घरी पाठविण्यात आले. त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर, परिचारिका व वैद्यकीय कर्मचाऱयांनी टाळय़ा वाजवून त्यांना निरोप दिला. पुढचे चौदा दिवस घरीच राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी त्यांना दिला आहे.
बिम्सच्या रुग्णवाहिकेतून बरे झालेल्या रुग्णांना त्यांच्या घरी पाठविण्यात आले. जिल्हय़ातील एकूण 108 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. बरे होण्याचे प्रमाणही वाढले असून निम्म्याहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत. 108 पैकी हिरेबागेवाडी येथील एका वृद्धेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर 65 जणांना आतापर्यंत घरी पाठविण्यात आले आहे.
रुग्ण क्रमांक 418 असलेल्या आझाद गल्ली येथील 25 वषीय महिलेला आपल्या वडिलांच्या संपर्कातून कोरोनाची लागण झाली होती. 21 एप्रिल रोजी तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे शहरातील मध्यवर्ती भागात बॅरिकेड्स उभे करून जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केले होते. या महिलेच्या थेट संपर्कातील लोकांबरोबरच आझाद गल्ली, माळी गल्ली परिसरातील 360 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. ते निगेटिव्ह आले आहेत.
ही महिला संकेश्वर येथील आपल्या माहेरी गेली होती. तिचे वडील निजामुद्दिन मरकजमधील धर्मसभेत भाग घेऊन गावी आले होते. लॉकडाऊनच्या काळात ही 25 वषीय महिला आपल्या पतीसमवेत मोटारसायकलवरून बेळगावला आली होती. आधी तिच्या वडिलांचा स्वॅब तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाने तिचाही स्वॅब तपासणीला घेतला होता. 21 एप्रिल रोजी तिचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आता या परिसरातील 360 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासनाबरोबरच स्थानिक नागरिकांनीही सुटकेचा निःश्वास टाकलेला आहे.