उदय पारिपत्ये यांचे तहीलदारांना निवेदन
वार्ताहर / सातार्डा:
लॉकडाऊनमुळे गोवा राज्यात नोकरीला जाणारे तरुण – तरुणी सिंधुदुर्ग जिल्हय़ात अडकले आहेत. लॉकडाऊनची मुदत अनिश्चत असल्याने गोवा राज्यातील कंपनींच्या मालकांनी तरुण-तरुणींना वेतन द्यावे तसेच नोकऱयांमध्ये सामावून घ्यावे, अशा मागणीचे निवेदन तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना देण्यात आले. रोजगाराचा मोठा प्रश्न असल्याने जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांचे लक्ष वेधणार असल्याचे तहसीलदार म्हात्रे यांनी सांगितले.
माजी सरपंच उदय पारिपत्ये, दोस्ती युवक मंडळाचे अध्यक्ष योगेश गोवेकर, पत्रकार परशुराम मांजरेकर यांनी पंचक्रोशीतील तरुण-तरुणींच्या स्वाक्षरीचे निवेदन सादर केले. लॉकडाऊनमुळे सिंधुदुर्ग जिल्हय़ाचे प्रवेशद्वार असलेले पोलीस चेकपोस्ट बंद आहे. गोव्यातील कंपनी मालकांनी कर्मचाऱयांसाठी पासची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. मात्र, कोरोना व्हायरस तपासणी फी, संस्थात्मक विलगीकरण शुल्क कर्मचाऱयांना परवडणारे नाही.
गेल्या दोन महिन्यापासून गोवा राज्यात नोकरी करणाऱया कर्मचाऱयांवर उपासमारीची वेळ आली आहे. लॉकडाऊनमुळे युवक-युवती घरी आहेत. गोव्यातील कंपनीच्या मालकांनी तरुण-तरुणींना दरमहाचे वेतन द्यावे, पावसाळय़ात तरुण-तरुणींना लॉकडाऊनमुळे नोकरी नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. लॉकडाऊनचा कालावधी अनिश्चित असल्याने गोव्यातील कंपनीच्या मालकांनी पूर्वीप्रमाणेच प्राधान्य द्यावे अशा मागणींचे निवेदन तहसीलदार म्हात्रे यांना देण्यात आले आहे.