प्रतिनिधी/ बेळगाव
जिल्हय़ातील 11 संशयितांचे स्वॅब तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्हा सर्वेक्षण विभागाने शुक्रवारी रात्री जाहीर केलेल्या बुलेटिनमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाला आणखी 89 जणांच्या अहवालांची प्रतीक्षा आहे.
बेळगावमध्ये कोरोना तपासणी केंद्र सुरू झाले आहे. एकावेळेला 90 या प्रमाणे रोज 180 जणांची स्वॅब तपासणी या केंद्रात केली जाते. येथील आयसीएमआरमध्ये सुरू करण्यात आलेल्या प्रयोग शाळेत रोजच्या रोज बेळगाव जिल्हय़ातील संशयितांची स्वॅब तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे एक दोन दिवसांत अहवाल मिळण्याची व्यवस्था झाली आहे.
गुरुवारी आणखी 100 अहवालांची प्रतीक्षा होती. यापैकी 11 निगेटिव्ह आल्याने आता 89 जणांचे अहवाल यायचे आहेत. जिल्हय़ातील 8134 जणांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यात आले असून 259 जणांना 14 दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा सर्वेक्षण विभागातील अधिकाऱयांनी दिली आहे.
आतापर्यंत जिल्हय़ातील 6 हजार 837 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी 6 हजार 519 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 108 अहवाल पॉझिटिक्ह आले आहेत. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या 55 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. उर्वरित 60 जणांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत.
हिरेबागेवाडी या एकाच गावात रुग्णसंख्या वाढली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने या गावात तपासणीही वाढविली आहे. घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत असून ज्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येतात तशा संशयितांना क्वारंटाईनमध्ये पाठविण्यात येत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सदाशिवनगर परिसरातही खबरदारी वाढविण्यात आली आहे.