प्रतिनिधी/ बेळगाव
जिल्हय़ातील 147 जणांचे स्वॅब तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. बुधवारी रात्री जिल्हा सर्वेक्षण विभागाने जारी केलेल्या बुलेटिनवरून ही माहिती उघड झाली असून राज्य आरोग्य विभाग व जिल्हा सर्वेक्षण विभागाकडून जारी करण्यात आलेल्या बुलेटिनमध्ये चुकीची माहिती दिली जात असल्याचे दिसून आले आहे.
जिल्हय़ातील 5 हजार 370 जणांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यात आले आहे तर 3 हजार 17 जणांना क्वारंटाईनमध्ये ठेवले आहे. 48 जणांवर विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत. आतापर्यंत 4 हजार 68 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले आहेत. यामध्ये 2 हजार 672 अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती या अहवालात देण्यात आली आहे.
जिल्हय़ातील 55 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी एका वृद्धेचा मृत्यू झाला आहे. बुधवारपर्यंत प्रत्यक्षात 8 जण कोरोनामुक्त झाले आहेत. या अहवालात ही संख्या 6 दाखविण्यात आली आहे. प्रशासनाला आणखी 1316 अहवालांची प्रतीक्षा असून एक-दोन दिवसात हे अहवाल उपलब्ध होणार आहेत.
तर राज्य आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटिनमध्येही चुकीची माहिती देण्यात आली आहे. बेळगावात आतापर्यंत 55 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आजवरच्या अहवालांवरून स्पष्ट झाले आहे. या अहवालात एकूण रुग्णांची संख्या 53 असा उल्लेख करण्यात आला आहे. यावरून या दोन्ही अहवालात चुकीची माहिती दिली जात असल्याचे स्पष्ट होते.