प्रशासनाला आणखी 1313 अहवालांची प्रतीक्षा
प्रतिनिधी/ बेळगाव
दोन दिवसांत बेळगाव शहर व जिल्हय़ातील 17 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्हय़ात कोरोनाबाधितांची संख्या 139 वर पोहोचली असून गेल्या 24 तासात 192 जणांचे स्वॅब तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
आरोग्य विभागाने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार 1508 संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. बुधवारच्या अहवालात ही संख्या 1313 वर पोहोचली असून उर्वरित 192 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्हय़ातील 11 हजार 58 जणांच्या आरोग्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले आहे.
परराज्यांतून येणाऱयांची संख्या वाढली आहे. त्यामुळे 2 हजार 868 जणांना 14 दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. 3 हजार 34 जणांनी 14 दिवसांचे तर 5 हजार 104 जणांनी 28 दिवसांचे क्वारंटाईन पूर्ण केले असून आतापर्यंत जिल्हय़ात 139 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
सध्या 52 जणांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार
9 हजार 762 संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी 8 हजार 146 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत एकूण 94 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. बुधवारी दाखल झालेल्या दोन वर्षांच्या बालिकेसह 52 जणांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत.