दुसऱया टप्प्यात 79 टक्के लसीकरण पूर्ण : पशुसंगोपन खात्याकडून माहिती
प्रतिनिधी /बेळगाव
बुसेलोसिस या धोकादायक संसर्गजन्य रोगाला आळा घालण्यासाठी पशुसंगोपन खात्याने सप्टेंबरपासून रोगप्रतिबंधक लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. दुसऱया टप्प्यात जिल्हय़ातील 27 हजार 148 मादी जातीची रेडके आणि वासरांना ही लस देण्यात आली. लसीकरणाचे 79 टक्के काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती पशुसंगोपनने दिली आहे.
जिल्हय़ात सप्टेंबर 2021 पासून ही मोहीम राबविण्यात येत आहे. पशुपालकांच्या घरोघरी जाऊन गायी-म्हशींच्या चार ते आठ महिन्यांच्या मादी जातीच्या वासरांना लस दिली जात आहे. या आजाराचा जनावरांबरोबर मानवालाही धोका पोहोचू शकतो, यासाठी खबरदारी म्हणून खात्यामार्फत अविरत सेवा सुरू आहे. या रोगाबाबतचे एकही प्रकरण अद्याप समोर आले नसले तरी खात्याने खबरदारी म्हणून मोहीम हाती घेतली आहे. बेळगाव जिल्हा सीमाहद्दीवर असल्याने जनावरांच्या बाजारातून आणि इतर ठिकाणी प्रत्यक्ष संपर्क येत असतो. त्यामुळे एखाद्या जनावराला या आजाराची लागण झाल्यास त्याचा प्रसार झपाटय़ाने होतो. याकरिता खात्याने खबरदारी म्हणून लसीकरण हाती घेतले आहे.
ब्रुसेलोसिसची जनावरांना लागण झाल्यास गर्भपात होतो. शिवाय दुभत्या जनावरांची दूध देण्याची क्षमता कमी होते. तसेच संक्रमित जनावराचे दूध शरीरास अपायकारक असते. याकरिता पशुपालकांनी आपल्या गायी-म्हशींच्या वासरांना लस टोचून घ्यावी, असे आवाहनही खात्याने केले आहे.
वासरांना लस घेण्याचे आवाहन
ब्रुसेलोसिसच्या दुसऱया टप्प्यात 79 टक्के लसीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित वासरांसाठी तिसऱया टप्प्यातील कामाला प्रारंभ झाला आहे. गायी-म्हशींच्या वासरांना या रोगापासून दूर ठेवण्यासाठी सर्व पशुपालकांनी वासरांना लस टोचून घ्यावी.
डॉ. ए. के. चंद्रशेखर (उपनिर्देशक पशुसंगोपन खाते)
बुसेलोसिस प्रतिबंधक लस दिलेली जिल्हानिहाय वासरे
तालुके | वासरांची संख्या | रेडकांची संख्या | एकूण |
अथणी | 585 | 1113 | 1698 |
कागवाड | 108 | 472 | 580 |
बैलहोंगल | 453 | 651 | 1134 |
कित्तूर | 319 | 286 | 605 |
चिकोडी | 1031 | 3024 | 4055 |
निपाणी | 376 | 1020 | 1396 |
गोकाक | 1342 | 2031 | 3373 |
मुडलगी | 1287 | 2125 | 3412 |
बेळगाव | 535 | 977 | 1512 |
हुक्केरी | 483 | 1399 | 1882 |
खानापूर | 615 | 1063 | 1678 |
रामदुर्ग | 882 | 761 | 1634 |
रायबाग | 982 | 1602 | 2584 |
सौंदत्ती | 647 | 949 | 1596 |
एकूण | 9645 | 17503 | 27148 |