आरोग्य खात्याकडून तयारी : शाळा-कॉलेजमध्येच होणार लसीकरण
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोना महामारीची तिसरी लाट थोपविण्यासाठी सोमवार दि. 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांना लस देण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य, शिक्षण व पंचायतराज खात्यांनी तयारी पूर्ण केली असून शाळा-कॉलेजमध्येच लसीकरण करण्यात येणार आहे. 3 लाख 1 हजार 828 मुलांना कोव्हॅक्सिन देण्यात येणार आहे.
जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने शुक्रवारी यासंबंधी एक पत्रक प्रसिद्धीस दिले असून जिल्हय़ातील परिस्थितीची माहिती देण्यात आली आहे. 15 ते 18 वषीय मुलांना ती शिकत असलेल्या शाळा-कॉलेजमध्येच लस देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य विभागाने तयारी केली असून शाळा-कॉलेजना त्याची माहिती देण्यात आली आहे.
16 जानेवारी 2021 पासून बेळगाव येथे लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात झाली. त्यामुळे कोरोना नियंत्रणात मोठी परिणामकारक मदत झाली. जिल्हय़ात लसीकरणाची मोहीम यशस्वी झाली असून पहिल्या टप्प्यात कोरोना योद्धय़ांना 44 हजार 442 जणांना पहिला डोस व 44 हजार 117 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
यामध्ये पोलीस, महसूल, पंचायतराज व इतर विभागातील कोरोनाच्या काळात फ्रंटलाईनमध्ये राहून काम केलेल्या योद्धय़ांना प्रामुख्याने लस देण्यात आली आहे. 17 सप्टेंबर 2021 रोजी एका दिवसात 2 लाख 99 हजार 733 जणांना लस देण्यात आली. संपूर्ण देशात एका दिवसात झालेला हा उच्चांक आहे.
जिल्हय़ात 35 लाख 29 हजार 403 जणांना पहिला डोस देण्यात आला असून 29 लाख 15 हजार 804 जणांना दुसरा डोस मिळाला आहे. पहिल्या टप्प्यात 98.97 टक्के तर दुसऱया टप्प्यात 81.77 टक्के लसीकरण झाले आहे. आता 15 ते 18 वर्षांतील 3 लाख 1 हजार 828 मुलांना कोव्हॅक्सिन देण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाले आहे.
नॅशनल टेक्नीकल एडव्हायजरी ग्रुप ऑफ इम्युनायझेशनच्या शिफारसीनुसार 3 जानेवारीपासून मुलांना लस देण्यात येणार आहे. तिसरी लाट थोपविण्यासाठी मुलांना कोव्हॅक्सिन देण्यात येत असून शाळा-कॉलेजमध्ये जाऊन लस देण्यात येणार आहे. शाळा व पदवीपूर्व कॉलेज प्रशासनाला यासंबंधी माहिती देण्यात आली असून सोमवारपासून मुलांच्या लसीकरणाला प्रारंभ होणार आहे.