बुधवारी बेळगावला दिलासा, आणखी 297 अहवालांची प्रतीक्षा
प्रतिनिधी/ बेळगाव
जिल्हय़ातील 30 जणांचा स्वॅब तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर बुधवारी सायंकाळी राज्य आरोग्य विभागाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये बेळगावला थोडासा दिलासा मिळाला आहे. कारण गेल्या 24 तासांत बेळगाव शहर व जिल्हय़ात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही.
मंगळवारी 327 स्वॅब तपासणी अहवाल यायचे होते. बुधवारी ही संख्या 297 वर पोहोचली आहे. प्रयोगशाळेत आणखी 297 स्वॅब तपासणीची प्रक्रिया सुरू आहे. तर गेल्या 24 तासांत 30 संशयितांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. हे सर्वजण क्वारंटाईनमधील असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
जिल्हा सर्व्हेक्षण विभागाने बुधवारी रात्री दिलेल्या माहितीनुसार जिल्हय़ातील 16 हजार 154 जणांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यात आले आहे. तर 14 हजार 42 जणांना 14 दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये ठेवले आहे. आतापर्यंत 6 हजार 208 जणांनी 14 दिवसांचे तर 8 हजार 452 जणांनी 28 दिवसांचे क्वारंटाईन पूर्ण केले आहे.
आतापर्यंत जिल्हय़ातील 14 हजार 858 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 301 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह तर 13 हजार 860 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आतापर्यंत 256 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात आणखी 52 बाधितांवर उपचार सुरू असून अद्याप 297 अहवाल यायचे आहेत.
कडोली नव्हे मरणहोळ
मंगळवारी बेळगाव जिल्हय़ातील तिघा जणांचे स्वॅब तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले होते. यापैकी कडोली येथील एका संशयिताचा समावेश असल्याची माहिती वैद्यकीय विभागाने दिली होती. मात्र हा रुग्ण कडोलीचा नसून मरणहोळचा असल्याचे आढळून आले आहे.