तौक्तेचा पश्चिम भागाला सर्वाधिक फटका
प्रतिनिधी/ सातारा
रविवारी दिवसभर आणि रात्री व सोमवारी सकाळी जिह्यात तौक्ते वादळामुळे पाऊस सुरु होता. सकाळी आठ वाजेपर्यंत मोजला गेलेला पाऊस सुमारे 22.53 मिलीमीटर एवढी झाली आहे. तर जिह्यात सर्वात जास्त पावसाची नोंद महाबळेश्वर तालुक्यातील लामज येथे 128.3 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिह्यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. विद्युत पोल मोडून पडले आहेत. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. सातारा शहरातही अनेक ठिकाणी झाडे पडली होती. शहरातील काही भागाचा विद्युत पुरवठा रविवारी रात्री खंडीत झाला होता. शहापूर उपसा योजनेचा विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने शहराच्या काही भागाला कमी दाबाने पाणी पुरवठा झाला, दरम्यान, तौक्ते वादळामुळे जिह्यातील 61 इमारतींचे नुकसान झाले आहे.
तौक्ते या वादळामुळे सातारा शहरात काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तर झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत. फुटका तलाव परिसरातील एक झाड पडले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नियोजन भवनाच्या लगतच्या झाडाची फांदी पडली आहे. बांधकाम भवनासमोरील रस्त्याकडेच्या झाडाची फांदी तुटली आहे. शहरालगत असलेल्या डबेवाडी येथील झाडांच्या फांद्या तुटल्या आहेत. एमआयडीसीमध्ये काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटल्या आहेत. त्यामुळे काही ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. विद्युत पुरवठा दुपारपर्यंत सुरळीत करण्यात येईल, अशी माहिती महावितरणचे अभियंता जितेंद्र माने यांनी दिली.
शहापूर उपसा केंद्राचा विद्युत पुरवठा खंडीत
शहराला पाणी पुरवठा करणाऱया शहापूर उपसा योजनेचा विद्युत पुरवठा रात्री तीन तास खंडीत झाला होता. पहाटे विद्युत पुरवठा सुरळीत झाल्याने पाण्याचा उपसा सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे शहराच्या काही भागाला सोमवारी पाणी पुरवठा झाला नाही, नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
जिह्यात 22.53 मिलीमीटर पावसाची नोंद
जिह्यात आज पहाटे आणि काल दिवसभरात सरासरी एकूण 22.53 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिह्यात सकाळी 8 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे. सातारा- 19.10 मि. मी., जावळी- 32.04 मि.मी. पाटण-35.08 मि.मी., कराड-32.92 मि.मी., कोरेगाव-6.11 मि.मी., खटाव-5.81 मि.मी., माण- 0.42 मि.मी., फलटण- 0.00 मि.मी., खंडाळा- 2.45 मि.मी., वाई ा 18.14 मि.मी., महाबळेश्वर-94.7 याप्रमाणे आतापर्यंत एकूण 22.53 मि.मी. सरासरी पावसाची नोंद झाली आहे. सकाळी आठ वाजेपर्यंत नोंद झालेल्यामध्ये महाबळेश्वर तालुक्यातील लामज मंडलात उंचाकी 128.3 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिह्यात 61 इमारतीचे नुकसान
सातारा जिह्यात तोक्ते या वादळामुळे नुकसान झाले आहे. जावली तालुक्यात 9 घरांची पडझड झाली आहे. कोरेगाव तालुक्यात 1 घराचे अंशत नुकसान झाले आहे. कराड ताललुक्यात 7 घरांची पडझड, 2 जनावरांच्या गोटय़ांची, एका पोल्ट्री शेडचे एका शाळेचे नुकसान झाले आहे. पाटण तालुक्यात 10 घरांचे अंशत नुकसान झाले आहे. महाबळेश्वर तालुक्यात 22 घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. 3 शासकीय इमारतींचे अशंत नुकसान झाले असून 18 विद्युत पोल पडले आहेत. वाई तालुक्यात 7 घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. 1 शाळेचे नुकसान झाले असून 10 विद्युत खांबाचे नुकसान झाले आहे. आंबा, नारळ, फळबागाचे नुकसान झाले आहे. खंडाळा तालुक्यात विद्युत पोलचे नुकसान झाले आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
पाचगणी शहर अंधारात तीन ठिकाणी झाडे पडली
पाचगणी शहरात तीन ठिकाणी रात्री झाडे पडल्याने संपूर्ण शहर अंधारात होते. टेबल लॅण्डकडे जाणाऱया रस्त्यावर तसेच शॉपिंग सेंटर समोरील मुख्य रस्त्यावर आणखी दोन ठिकाणी झाडे पडल्याने विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. संपूर्ण पांचगणी शहर अंधारात होते. सकाळी झाडांच्या फांद्या व तुटलेल्या विद्युत तारा दुरुस्तीचे काम महावितरण आणि पालिकेकडून सुरु होते.
जिल्हा परिषदे मैदानावर दैना
तात्पुरत्या स्वरुपासाठी सोशल डिस्टन्स पाळण्यात यावा म्हणून जिल्हा परिषदेच्या मैदानावर सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीने सुरु केलेल्या भाजी मंडईची पुरती दैना पावसाने उडवून दिली. मैदानावर भाजी विक्रेत्यांच्या वाहनांच्या टायरामुळे सगळा चिखल झाला होता. काही विक्रेत्यांनी खराब झालेली भाजी तेथेच बाजूला टाकून दिली होती. मैदानात सगळा चिखलच झाल्याने त्याच चिखलात कसेबसे भाजी विक्रेते बसले होते. खरेदी करणारेही स्वतःला सावरत खरेदी करत होते. प्रवेशद्वाराजवळही काही विक्रेते बसले होते. पोलिसांनी अनेक विक्रेत्यांना आपला गाशा गुंडाळायला लावल्याचे दिसत होते.
जिह्यात सगळयाच मंडलात पावसाची नोंद
मंडलनिहाय पाऊस मिलीमीटरमध्ये सातारा 27 (मि.मी.), खेड 25(मि.मी.), वर्ये 20(मि.मी.),. कण्हेर 21(मि.मी.), नागठाणे 28(मि.मी.), आंबवडे 36(मि.मी.), दहिवड 8(मि.मी.), परळी 8(मि.मी.), वडूथ 12(मि.मी.), तासगाव 0(मि.मी.), अपशिंगे 28(मि.मी.), सातारा तालुक्यात एकूण 229.20 (मि.मी.) सरासरी 19.10(मि.मी.) एवढा पाऊस झाला आहे. कराड तालुक्यात कराड 34(मि.मी.), मलकापूर 35(मि.मी.), सैदापूर 42(मि.मी.), कोपर्डे 18(मि.मी.), मसुर 27(मि.मी.), उंब्रज 25(मि.मी.), शेणोली 30(मि.मी.), कवठे 25(मि.मी.), काले 45(मि.मी.), कोळे 38(मि.मी.), उंडाळे 53(मि.मी.), सुपने 36(मि.मी.), इंदोली 20(मि.मी.) असा एकूण 428(मि.मी.) सरासरी 32.92(मि.मी.) पाऊस झाला आहे. खटाव तालुक्यात खटाव 4(मि.मी.), औंध 14.80(मि.मी.), पुसेगाव 5.20(मि.मी.), बुध 3.10(मि.मी.), वडूज 3.40 (मि.मी.), पुसेसावळी 13.20(मि.मी.), मायणी 4(मि.मी.), निमसोड 2.40(मि.मी.), कातरखटाव 2.20(मि.मी.) असा एकूण 52.30 (मि.मी.) सरासरी 5.81 (मि.मी.) पाऊस झाला. महाबळेश्वर तालुका 83.8(मि.मी.), पाँचगणी 55.8(मि.मी.), तापोळा 110.9(मि.मी.), लामज 128.3(मि.मी.) तर वाई तालुका पसरणी 16(मि.मी.), पाचवड 27(मि.मी.), धोम 15(मि.मी.), वाई 16(मि.मी.), भुईंज 28(मि.मी.), ओझर्डे 17(मि.मी.), सुरुर 8(मि.मी.), पाटण तालुका पाटण 50(मि.मी.), म्हावशी 49(मि.मी.), हेळवाक 20(मि.मी.), मरळी 42(मि.मी.), मोरगिरी 30(मि.मी.), ढेबेवाडी 32 (मि.मी.), चाफळ 46(मि.मी.), तारळे 27(मि.मी.), मल्हारपेठ 25(मि.मी.), तळमावले 22(मि.मी.), कुठरे 51(मि.मी.) जावली तालुका केळघर 15.4(मि.मी.), बामणोली 61(मि.मी.), करहर 56.6(मि.मी.), कुडाळ 18.2(मि.मी.) , आनेवाडी 28.2(मि.मी.) अशी नोंद झाली आहे.