415 परीक्षा केंद्रे : प्रत्येक केंद्रावर वैद्यकीय पथक नेमणार
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनामुळे रखडलेली 2020-21 ची दहावीची परीक्षा अखेर दि. 19 व 22 जुलै रोजी घेतली जाणार आहे. यासाठी बेळगाव जिल्हय़ात आतापासूनच पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे. यावषी बेळगाव व चिकोडी या दोन्ही शैक्षणिक जिल्हय़ात मिळून 80,357 विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत.
प्रत्येक विषयाला 40 गुण देण्यात येणार असून 1 पेपर 120 गुणांचा असणार आहे. 19 जुलै रोजी गणित, समाज व विज्ञान तर 22 जुलै रोजी प्रथम, द्वितीय व तृतीय भाषा यांची परीक्षा घेतली जाणार आहे. प्रत्येक वर्गखोलीमध्ये 12 विद्यार्थी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
हॉलतिकीट उपलब्ध
शिक्षण विभागाने जाहीर केल्याप्रमाणे 30 जूनपासून हॉलतिकीट डाऊनलोड करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. प्रत्येक शाळांच्या लॉग ईन आयडीवर हॉलतिकीट देण्यात आले आहे. आता शाळांकडून हॉलतिकीट डाऊनलोड करून विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.
परीक्षा केंद्रांवर आल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याची तपासणी केली जाणार आहे. यासाठी प्रत्येक केंद्रावर वैद्यकीय पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. सर्दी, ताप, खोकला यांची सौम्य लक्षणे असणाऱया विद्यार्थ्यांना स्वतंत्र कक्ष उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यामध्ये ते परीक्षा देऊ शकणार आहेत.