अहवाल निगेटिव्ह आल्याने 467 जणांची सुटका
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना महामारीचा फैलाव वाढतो आहे. बेळगाव जिल्हय़ातील रुग्ण संख्येने रविवारी शतक पार केले आहे. त्यामुळे जिल्हय़ात व्यापक खबरदारी घेण्यात येत असून जिल्हय़ातील आणखी 900 जणांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. दोन वेळा स्वॅबतपासणी अहवाल निगेटिव्ह आलेल्या 467 जणांची आतापर्यंत क्वारंटाईनमधून सुटका करण्यात आली आहे.
जिल्हा प्रशासनाने ही माहिती दिली आहे. कोरोनाबाधितांच्या प्राथमिक संपर्कात 1 हजार 485 जण आले आहेत. द्वितीय संपर्कात 2 हजार 935 जण आले आहेत. संशयितांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यासाठी 43 हॉटेल्स ताब्यात घेण्यात आली आहेत. 14 दिवस क्वारंटाईनमध्ये ठेवून संशयितांची स्वॅब तपासणी करण्यात येते. दोन वेळा त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी पाठविण्यात येते.
दरम्यान, जिल्हा सर्वेक्षण विभागाने सोमवारी सायंकाळी जारी केलेल्या बुलेटिनमध्ये जिल्हय़ातील आणखी 274 जणांच्या स्वॅबतपासणी अहवालांची प्रशासनाला प्रतीक्षा आहे. जिल्हय़ातील 7 हजार 915 जणांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यात आले आहे. 2 हजार 244 जणांना 14 दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.
आतापर्यंत 6 हजार 620 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी 6 हजार 161 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 107 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. बागलकोट जिल्हय़ातील आठ कोरोनाबाधितांनाही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. उपचारानंतर कोरोनामुक्त झालेल्या 37 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात 77 जणांवर उपचार करण्यात येत आहेत.