बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव आणि चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यातून यंदा 78 हजार 587 विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत. सोमवार दि. 28 मार्चपासून 11 एप्रिलपर्यंत परीक्षा होणार असून शिक्षण खात्याने याची सर्व तयारी केली आहे. परीक्षा काळात सर्व केंद्रांच्या परिसरात 144 कलममध्ये जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आल्याची माहिती बेळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड यांनी दिली.
उद्या सोमवारपासून राज्यभर दहावीच्या परीक्षेस प्रारंभ होणार आहे. गेली दोन वर्षे कोरोनाच्या दहशतीखाली झाली होती. यंदाही दहशत कायम असून बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 278 तर शैक्षणिक जिल्ह्यात 307 आरोग्य कर्मचाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे. संपूर्ण जिल्ह्यात 296 परीक्षा केंद्रे असून तेथे तब्बल 78 हजार 587 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
बेळगाव जिल्ह्यात 493 माध्यमिक शाळांसह 139 परीक्षा केंद्रे आहेत. त्यामध्ये 33 हजार 807 विद्यार्थी परीक्षा देतील. परीक्षेदरम्यान 50 मुख्य पर्यवक्षक, 278 आरोग्य कर्मचारी तर 2 हजार 235 पर्यवक्षक कार्यरत असतील. चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यातून 157 केंद्रामधून 44 हजार 780 विद्यार्थी परीक्षा देणार असून 4 हजार 507 पर्यवक्षक यांच्यावर लक्ष ठेवणार आहेत. त्यात 17 हजार 118 विद्यार्थी तर 16 हजार 689 विद्यार्थिनींचा समावेश आहे.
तसेच 307 आरोग्य कर्मचारी कार्य करीत असतील. अशी माहिती चिकोडी जिल्हा शिक्षणाधिकारी मोहनकुमार हंचाटी यांनी दिली.
परीक्षेच्या काळात सर्व परीक्षा केंद्राच्या परिसरात 144 कलमान्वये जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. तसेच परिसरातील झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. यंदा परीक्षा कडक बंदोबस्तात ठेवणार असून सर्व परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱयाची नजर राहणार आहे.