प्रतिनिधी/ सातारा
केंद्र व राज्य शासनाच्या सुचनेनुसार सातारा जिल्हय़ातील कोविड-19 अंतर्गत लसिकरण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. या अंतर्गत सध्या सातारा जिल्हय़ातील 18 वर्षावरील नागरिकांना मोफत लसिकरण सुरू आहे. यापार्श्वभुमीवर बुधवार दि. 8 सप्टेंबर रोजी सातारा जिल्हय़ात कोविड-19 चे महा लसिकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
यामोहिमे अंर्गत सातारा जिल्हय़ात कोविडशिल्ड लसीचे 1 लाख 41 हजार व कोव्हॅक्सीनचे 6 हजार 400 असे एकुण 1 लाख 47 हजार 400 डोस उपलब्ध असुन हे महालसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. सातारा शहर विभाग, कराड, वाई, फलटण, कोरेगाव येथे लसीकरणकरीता ऑनलाईन नोंदणी आवश्यक आहे. तसेच जिल्हय़ातील सर्व शासकिय रूग्णालय, उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालय, उप जिल्हा रूग्णालय व जिल्हा सामान्य रूग्णालय ये ही मोहिम राबविण्यात येणार आहे.
आज अखेर सातारा जिल्हय़ात एकुण 13 लाख 90 हजार 57 नागरिकांना प्रथम डोस तर 5 लाख 65 हजार 338 नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. एकुण 19 लाख 55 हजार 395 नागरिकांना कोविड-19 चे लसीकरण करण्यात आले आहे. तरी जिल्हय़ातील 18 वर्षावरील लसीकरण लाभार्थ्यांनी या लसीकरण शिबिराचा लाभ घ्यावा, असे जिल्हा आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सातारा तर्फे कळविण्यात आले आहे.