एक वगळता आतापर्यंतचे सर्व 33 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह : पॉझिटिव्ह रुग्णाची प्रकृतीही स्थिर
- नियम मोडल्याने होम क्वारंटाईन केलेल्या सहाजणांवर गुन्हे दाखल
- जमावबंदी आदेश मोडणाऱया 84 जणांवर गुन्हे दाखल
- जिल्हय़ात बेघर, कामगारांसाठी 10 ठिकाणी कॅम्पचे आयोजन
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या उर्वरित सहा रुग्णांचे नमुनेही निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या एकूण 34 पैकी एक पॉझिटिव्ह वगळता उर्वरित सर्व 33 ही नमुने निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्हावासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी होम क्वारंटाईन केलेल्या सहाजणांवर, तर जमावबंदीचा आदेश मोडणाऱया 84 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.
जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये एकूण दहा रुग्ण दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. जिल्हय़ात सध्या 203 व्यक्तींना घरीच विलगीकरणात ठेवलेले असून 57 व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱयांना सोमवारी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे व्हेंटिलेटरी मॅनेजमेंट ऑफ कोविड-19 या बाबत एम्सतर्फे प्रशिक्षण देण्यात आले. आयएमए आणि खासगी वैद्यकीय व्यावसायिक यांच्याशी के. मंजुलक्ष्मी यांनी चर्चा केली. यावेळी अत्यावश्यक प्रसंगी व्हेंटिलेटर्स व इतर वैद्यकीय उपकरणांचा वापर कोरोनाच्या उपचारांसाठी करण्याची त्यांनी तयारी दर्शविली.
नियम मोडणाऱया सहाजणांवर गुन्हे दाखल
घरीच विलगीकरण करण्यात आलेल्या व्यक्तींनी त्यांना दिलेल्या सूचना पाळणे बंधनकारक आहे. त्यांना गर्दीमध्ये मिसळण्यास तसेच प्रवास करण्यास मनाई आहे. तरीही दिलेल्या सूचनांचे पालन न केल्याप्रकरणी जिल्हय़ात होम क्वारंटाईन केलेल्या सहाजणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ज्या व्यक्तींना होम क्वारंटाईन केले आहेत, त्यांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे योग्य पालन करावे व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. जमावबंदीचे आदेश मोडल्याप्रकरणी आतापर्यंत 84 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पालकमंत्र्यांनी घेतला आढावा
पालकमंत्री उदय सामंत यांनी आज व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जिल्हय़ातील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी ग्रामीण भागामध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होम डिलिव्हरीच्या माध्यमातून देण्यात यावा, अशा सूचना केल्या. जिल्हय़ात सध्या ताप व खोकल्याच्या रुग्णांचे सक्रीय सर्वेक्षण सुरू आहे. आरोग्य संस्थांमार्फत आतापर्यंत एकूण 3493 व्यक्तींची तपासणी करण्यात आली.
जिल्हय़ात बेघर व कामगारांसाठी 10 ठिकाणी कॅम्प
परराज्यातील मजूर, कामगार, बेघर यांच्यासाठी जिल्हय़ात 10 ठिकाणी कॅम्प उभारण्यात आले आहेत. याठिकाणी 446 व्यक्ती राहत असून त्यांच्यासाठी निवाऱयासोबतच जेवण, खाणे, पिण्याचे पाण्यासह सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यासाठी तालुकास्तरावर कॅम्पची सुविधा करण्यात आली आहे.