37 जणांचा रिपोर्ट येणे बाकी : वृद्धाश्रमांत आरोग्य तपासणी
प्रतिनिधी / सिंधुदुर्ग:
जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे एकूण 160 नमुने तपासणीसाठी मिरज येथे पाठविण्यात आले असून त्यापैकी 123 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. शनिवारी आणखी 17 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून ते सर्व निगेटिव्ह आहेत. तसेच 37 नमुन्यांचा अहवाल येणे बाकी आहे, अशी माहिती देण्यात आली.
जिल्हय़ात 382 व्यक्तींना घरीच अलगीकरण करण्यात आले आहे. 62 व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात असून 223 व्यक्तींचा 28 दिवसांचा अलगीकरणाचा कालावधी संपला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात 57 व्यक्ती दाखल आहेत.
कोविडा19 रोगाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या दृष्टीने जिल्हा रुग्णालयाच्या पथकातर्फे जिल्हय़ातील सात वृद्धाश्रमांची तपासणी करण्यात आली. एकूण 372 रुग्णांची तपासणी करून त्यांचे समुपदेशन करण्यात आले. तसेच आश्रमातील वृद्धांची रक्तदाब, मधुमेह तपासणी करून दोन महिन्यांच्या औषधांचा पुरवठा करण्यात आला. तसेच जिल्हय़ातील सहा निवारा केंद्रांची तपासणीही या पथकामार्फत करण्यात आली. त्यामध्ये 101 व्यक्तींची तपासणी करून त्यांचे समुपदेशन करण्यात आले. जिल्हय़ातील ओरोस व सावंतवाडी येथील कारागृहातील कैद्यांची तपासणी वैद्यकीय अधिकाऱयांमार्फत करण्यात आली. ओरोस येथील 66 कैद्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील 10 कैद्यांना असलेल्या किरकोळ आजारांवर औषधोपचार करण्यात आले, तर सावंतवाडी येथील कारागृहातील 60 कैद्यांची तपासणी करून त्यापैकी किरकोळ आजार असलेल्या 17 कैद्यांवर औषधोपचार करण्यात आले. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये सध्या जिल्हा रुग्णालयामार्फत डायलेसीसचे सात व केमोथेरपीचा एक रुग्ण सेवा घेत आहे. आरोग्य यंत्रणेमार्फत शनिवारी 1730 व्यक्तींची तपासणी करण्यात आली.
घरीच अलगीकरण 0382
संस्थात्मक अलगीकरण 0057
पाठविण्यात आलेले एकूण नमुने 0160
अहवाल प्राप्त झालेले नमुने 0123
आतापर्यंत पॉझिटिव्ह नमुने 0001
निगेटिव्ह आलेले नमुने 0122
अहवाल प्राप्त न झालेले नमुने 0037
विलगीकरण कक्षात दाखल 0057
सद्यस्थितीत पॉझिटिव्ह रुग्ण 0000
शनिवारी तपासणी झालेल्या व्यक्ती 1730