11 वर्षाच्या मुलासह सिव्हील कर्मचारी पॉझीटीव्ह
प्रतिनिधी/ रत्नागिरी
सोमवारी सायंकाळपासून जिल्हय़ात 35 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून बाधीतांची संख्या 785 वर पोहचली आहे. यातील 10 रुग्ण हे रुग्ण रत्नागिरी तालुक्यातील आहेत. यामध्ये 11 वर्षाच्या मुलासह सिव्हीलमधील आणखी एका कर्मचाऱयाचाही समावेश आहे. तर राजापुर ग्रामीण रूग्णालयातील तीन कर्मचारी व एका कुटुंबीयांचा अहवाल मंगळवारी सायंकाळी पॉझीटीव्ह आला आहे. दरम्यान, मंगळवारी 2 नवजात बालकांसह 13 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
सोमवारी कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण, रत्नागिरी येथून 7, जिल्हा कोव्हीड रुग्णालय येथून 5 आणि कोव्हीड केअर सेंटर, पाचल येथून 1 अशा 13 रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 507 झाली आहे. बरे होणाऱया रूग्णांचे प्रमाण 64 टक्के झाले आहे.
जिह्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली मात्र या लॉकडाऊनच्या कालावधीतच मोठय़ा संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. विशेषतः आरोग्य विभागातील कर्मचारी आणि अधिकारी यांना ही कोरोनाची लागण झाल्याने जिल्हा रुग्णालयासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. सोमवारी रात्री व मंगळवारी सायंकाळी आलेल्या अहवालांमध्ये रत्नागिरीत 10, चिपळूणमध्ये 6, दापोलीत 13 तर राजापूरात 6 नवे रूग्ण आढळले आहेत. रत्नागिरीतील रूग्णांमध्ये संगमेश्वरातील कुंडी येथील एकाच घरातील तिघांचा समावेश आहे.
जिल्हा रुग्णालयात रविवारी 3 कर्मचारी पॉझिटिव्ह आढळले असताना आणखीन सोमवारी आणखी एक कर्मचारी पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनयोद्धा म्हणून काम करणाऱया आरोग्य कर्मचाऱयांनी योग्य ती खबरदारी घेताना मास्क, पीपी किट चा वापर नियमित करावा, सॅनिटायझर वापरावे अशा सक्त सूचना सिव्हील प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
रत्नागिरी तालुक्यात सापडलेल्या 10 नव्या रुग्णांमध्ये एका 11 वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. याशिवाय सिव्हिलमधील एका ब्रदरला देखील कोरोनाची लागण झाली आहे. खासगी रुग्णालयात क्वारंटाईन असलेल्या तिघा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. पॉझिटिव्ह असलेल्या जेल पोलीसच्या मुलाला देखील कोरोना झाला आहे. राजीवडा, कुवारबाव, संभाजीनगर नाचणे, नवानगर, सन्मित्रनगर या भागातील नवे रुग्ण आहेत.
राजापूरात 3 आरोग्य कर्मचाऱयांसह 6 पॉझीटीव्ह
राजापूर शहरातील कोदवली साईनगर भागातील कोरोना रूग्णाची पत्नी आणि मुलाचा अहवालही पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधितांची 6 तर तालुक्यातील संख्या 44 झाली आहे. दरम्यान मंगळवारी सायंकाळी आलेल्या अहवालांमध्ये राजापूर ग्रामीण रूग्णालयातील तीन कर्मचारी व एकाच्या कुटुंबातील व्यक्ती अशा चौघांचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. वैद्यकीय अधिकारी व त्याची पत्नी पॉझीटीव्ह आढळल्यानंतर या सर्वांचे स्वॅब घेण्यात आले होते. आरोग्य यत्रणेला कोरोनाचा विळखा घट्ट होत असल्याने चिंता वाढली आहे.
10 हजार अहवाल निगेटिव्ह
जिल्हा रुग्णालयामार्फत आतापर्यंत 11 हजार 181 नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 10 हजार 877 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 781 अहवाल पॉजिटीव्ह आले असून 10 हजार 061 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. आणखी 304 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहेत.
तीन महिन्यांत 32 तान्हुल्यांची कोरोनावर मात
जिल्हा रुग्णालय म्हणजे कोरोना फैलावाचे केंद्र असा गैरसमज होत असताना तीन महिन्यांत तब्बल 32 बालकांनी कोरोनावर मात केल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. ज्येष्ठ बालरोगतज्ञ डॉ. दिलीप मोरे आणि त्यांच्या टीमने याबाबत आनंद व्यक्त केला आहे.
मंगळवारी कोरोनावर मात केलेल्या 2 नवजात बालकांसह 2 मातांवर पुष्पवृष्टी करून अनोख्या पद्धतीने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे डॉक्टरांचे मनोबलही वाढले आहे. रत्नागिरीत कोरोनामुळे बालमृत्यूचा दर शून्य टक्क्यावर आहे. बालकांना आईचे दूध हे अमृत ठरले आहे. आईच्या दुधामुळे कोरोना झालेल्या बालकांची रोग प्रतिकारशक्ती वाढते. त्याचबरोबर योग्यवेळी लसीकरण त्याचबरोबर लहान बाळांमध्ये चांगली इम्युनिटी सिस्टिम कार्यरत राहत असल्याचे डॉ. मोरे यांनी सांगितले.