प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन सुरू असतानाही रूग्णांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होत आह़े रविवारी रात्री प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिह्यात तब्बल 40 नवे कोरोना रूग्ण आढळल्याने एकूण बाधीतांची संख्या 750 झाली आह़े राजापूर ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व त्यांची पत्नीही पॉझीटीव्ह आल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे.
सोमवारी 10 जणांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 494 झाली आहे. यामध्ये जिल्हा कोव्हीड रुग्णालयातून 1 तर कोव्हीड केअर सेंटर घरडा, लवेल येथून 9 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. बरे होणाऱया रूग्णांचे प्रमाण 65 टक्के असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. दरम्यान कोरोनामुळे आतापर्यंत 28 जणांचा मृत्यू झाला असून उपचाराखाली असलेल्यांची संख्या 228 असून त्यातील तिघे होम क्वारंटाईन असून तीघांवर जिल्हय़ाबाहेर उपचार सुरू आहेत.
रविवारी रात्री सापडलेल्या रूग्णांमध्ये नव्याने आढळून आलेल्या रूग्णांमध्ये जिल्हा कोवीड रूग्णालय 10 जणांचा समावेश असून त्यात राजापूरातील वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या पत्नीचा समावेश आहे. त्याचबरोबर चिपळूण तालुक्यात 14 रूग्ण सापडले असून त्यात गोवळकोट येथील एकाच इमारतीतील 13 व केतकी येथील एकाचा समावेश आहे. खेड तालुक्यात 15 नवे रूग्ण सापडले असून यात घरडा वसाहतीतील 7, अपेडे व खोपीतील प्रत्येकी 2, कशेडीतील 3 तर वेरळमधील एकाचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. तर दापोली येथील एकाला कोरोनाची लागण झाली आहे.
रत्नागिरी शहरात राजेंद्रनगर, श्रीरामनगर, सन्मित्रनगर, मच्छिमार्केट या भागामध्ये कारोनाचे नवे रूग्ण आढळून आले आहेत़ खबरदारीचा उपया म्हणून रूग्ण राहत असलेल्या रहिवासी इमारतींना प्रशासनाकडून सील करण्यात आले आह़े रत्नागिरी तालुक्यात नाचणे गोडावुन स्टॉप, सन्मित्रनगर, नाचणे समर्थनगर, सीईओ बंगला, निवखोल, मच्छीमार्केट परिसर, कुर्धे हे सात क्षेत्र कोरोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. होम क्वारंटाईन खाली असणांरांची संख्या 15 हजार 611 इतकी आहे.
राजापुरात वैद्यकीय अधिकारी पॉझीटीव्ह
राजापूरः ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या पत्नीचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने शहरवीयांबरोबरच आरोग्य यंत्रणा हादरली आहे. त्यामुळे राजापुर शहरातील रूग्ण संख्या 4 तर तालुक्यातील बाधितांचा आकडा 42वर पोहोचला आहे.
गेले तीन महिने सेफ झोनमध्ये असलेल्या राजापूर शहरात शुक्रवारी सायंकाळी एक महिला कोरोनाबाधीत आढळली. दुसऱयाच दिवशी बाजारपेठेतील व्यापारी पॉझीटीव्ह आढळला. त्यापाठोपाठ रविवारी रात्री प्राप्त झालेल्या अहवालानुसार राजापूर शहरातील वैद्यकीय अधिकारी व त्याच्या पत्नीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. वैद्यकीय अधिकारी कोरोनाबाधीत आढळल्याने राजापूर ग्रामीण रुग्णालयातील 35 कर्मचाऱयांना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांचे स्वॅब घेण्यात येणार असल्याची माहीती तालुका आरोग्य विभागाने दिली आहे. दरम्यान शहरात शुक्रवारी सापडलेल्या महिला रूग्णाच्या संपर्कात आलेल्या खासगी डॉक्टरसह अन्य 18 जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.
राजापुरात खासगी दवाखानेही बंद
वैद्यकीय अधिकाऱयांना कोरोनाची लागण झाल्याने ग्रामीण रूग्णालय बंद करण्यात आले आहे. तर दुसरीकडे खासगी दवाखान्यातही रूग्ण तपासले जात नसल्याने रूग्णांची मोठी गैरसोय होत आहे. शुक्रवारी शहरात सापडलेली कोरोनाबाधित महिला खासगी डॉक्टरकडे तपासण्यासाठी गेल्याने या डॉक्टरलाही विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यानंतर राजापुरातील खासगी दवाखाने बंद ठेवण्यात आले आहेत. राजापूर ग्रामीण रूग्णालयातील सर्व कर्मचारी क्वारंटाईन असल्याने सद्यस्थितीत रूग्णालय बंद आहे. एका बाजूला खासगी दवाखाने बंद असताना आता ग्रामीण रूग्णालयही बंद असल्याने रूग्णांची गैरसोय होणार आहे.