एका दिवसांत 50 हजार जणांना लस,जिल्हय़ात 785 बाधित
प्रतिनिधी/ सातारा
जिह्यातील कोरोना बाधितांचा आकडा 2,29,576 वर पोहचला आहे. काल दिवसभरात जिह्यातील 785 जण बाधित आढळून आलेल्यापैकी फलटण तालुक्यातील 156 जण आढळून आल्याने तर आतापर्यंत सातारा तालुक्यातील बाधितांचा आकडा 47260 एवढा झाला आहे. शनिवारी दिवसभरात 716 जण कोरोना मुक्त झाले आहेत. दिवसभरात मृत्यू झालेल्या 27 मध्ये सातारा, कराड या दोन तालुक्यातील प्रत्येकी 6 जणांचा मृत्यू झाला आहे. 4 मार्चपासून लागू केलेल्या निर्बंधातून जिल्हावासीयांना स्वातंत्र्य मिळाले असून आजपासून जिल्हा अनलॉक झाला आहे. दरम्यान, शनिवारी उच्चांकी 50 हजार जणांनी लसीकरणाचा लाभ मिळाला आहे.
लसीकरणाचा विक्रम; तब्बल एका दिवसात 50 हजार जणांचे टुचुक
सातारा जिह्यातील 50 हजार 652 जणांनी आज लस घेतली आहे. त्यामध्ये शासकीय 328 तर खाजगी 29 केंद्रावर हे लसीकरण झाले. आतापर्यंत जिह्यातील 14 लाख 62 हजार 921 जणांनी लस घेतली असून त्यात पहिला डोस 10 लाख 23 हजार 834 जणांनी तर दुसरा डोस 4 लाख 39 हजार 87 जणांनी घेतला असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी सांगितले.
अनलॉकच्या निर्णयाची अंमलबजावणी आजपासूनच
सातारा जिह्यातील अनलॉकबाबत शुक्रवारी सायंकाळी जो जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जाहीर केलेला निर्णय आहे तो निर्णय रविवार रात्रीपासूनच लागू करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातुन देण्यात आली. अनलॉक व्हावे, सर्व व्यवहार पूर्वीप्रमाणे सुरू रहावेत असे सगळ्या जिल्हावासीयांना वाटते. तशी अनेकांनी मागणी ही केली आहे. काल जो निर्णय जाहीर झाला त्याबाबत जिह्यात संभ्रम होता. आज काही ठिकाणी दुकाने, आस्थापना उघडल्या नव्हत्या. काहींनी जिल्हाधिकारी कार्यालयात, दैनिकांच्या कार्यालयात याची चौकशी केली. दरम्यान, सायंकाळी उद्यापासून अनलॉकची अंमलबजावणी होणार असल्याचे सांगितले.
फलटण तालुक्यातील एका दिवसात जास्त बाधित
सातारा जिह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 785 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 27 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी दिली आहे. यामध्ये एकटय़ा फलटण तालुक्यात सर्वात जास्त बाधित आढळून आले आहेत. सातारा आणि कराड तालुक्यातील बाधित संख्या जास्त आहे. मृत्यू झालेल्यामध्ये कराड, सातारा या दोन्ही तालुक्यातील संख्या जास्त आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.
जावली 33 (9625), कराड 122 (36707), खंडाळा 35 (13494), खटाव 123 (22990), कोरेगांव 52 (19979), माण 61 (15792), महाबळेश्वर 6 (4549) पाटण 8 (9783), फलटण 156(32742), सातारा 141 (47260), वाई 42(14913) व इतर 6(1742) असे आज अखेर एकूण 229576 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आजअखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे. जावली 0 (206), कराड 6 (1102), खंडाळा 0 (175), खटाव 5(539), कोरेगांव 0 (432), माण 2 (317), महाबळेश्वर 1 (88), पाटण 2 (349), फलटण 1 (557), सातारा 6 (1376), वाई 3 (342) व इतर 1 (75), असे आज अखेर जिह्यामध्ये एकूण 5558 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
716 जणांना दिला आज डिस्चार्ज
सातारा जिह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 716 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.