जिल्हा रूग्णालयात 61 व्हेंटीलेटर मात्र ऑक्सिजनसाठी करावी लागते धडपड
प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हय़ातील शासकीय रूग्णालयांमध्ये 61 व्हेंटीलेटर उपलब्ध आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून तिपटीने कोरोनाचे रूग्ण वाढल्याने व्हेंटीलेटरची गरज अधिक वाढली आहे. व्हेंटीलेटर असतानाही केवळ ऑक्सिजन उपलब्ध नसल्याने ऑक्सिजन उपलब्धतेसाठी जिल्हा रूग्णालयाला विविध प्रयत्न करावे लागत आहेत. गेले अनेक दिवस ही समस्या निर्माण झाली असताना याकडे जिल्हा प्रशासनाने गांभिर्याने लक्ष घालण्याची मागणी आता रूग्णांच्या नातेवाईकांकडून केली जात आहे.
ऑक्सिजन उपलब्धतेबाबत जिल्हा रूग्णालयाकडून शासनाकडे प्रस्तावही गेले आहेत, मात्र सध्या ऑक्सिजन उपलब्ध होण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱयांना खूप प्रयत्न करावे लागत आहेत. कोरोना काळात ज्या पध्दतीने जिल्हा प्रशासनाने नियोजन व अंमलबजावणी करायला हवी होती, त्या पध्दतीने केली नाही. मुळात येथील आरोग्य यंत्रणेत सक्षम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने पाठपुरावा केल्याचे दिसत नाही. परिणामी आज व्हेंटीलेटर असताना ऑक्सिजन सप्लाय होत नाही म्हणून अत्यवस्थ रूग्णांना दाखल करताना आरोग्य विभागाला आधी ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध करावी लागते. रत्नागिरीत सध्या कोरोनाची संख्या तिपटीने वाढली असून जे आर्थिकदृष्टय़ा सक्षम आहेत, ते रूग्ण कोरोना झाल्यावर खासगी रूग्णालयांचा आधार घेत आहेत. त्यासाठी वेळेस कोल्हापूर, मुंबईला उपचारासाठी जात आहेत. मात्र सर्वसामान्य रूग्णांनी काय करावे, असा प्रश्न आता उभा राहिला आहे. जिल्हा प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी यामध्ये लक्ष घालावे, अशी मागणी आता रूग्णांच्या नातेवाईकांमधून व्यक्त होत आहे. ऑक्सिजन पुरवठा करणारे टँकर कोल्हापूरला वगैरे नियमित येतात. मग ते टँकर रत्नागिरीत यायला का उशीर होतो, असा प्रश्नही आता नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
सध्या ऑक्सिजन पुरवठा सुरळीत
सध्या ऑक्सिजन पुरवठा सुरळीत सुरू आहे. कोणाचीही गैरसोय अद्यापही झालेली नाही. हा पुरवठा अधिक व्हावा, यासाठी प्रशासन पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आरोग्य विभागालाही या बाबत प्रस्ताव दिला आहे.