अथणी तालुक्यातील 32 वर्षीय अभियंत्याचा मृत्यू
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनामुळे जिल्हय़ातील जनता हैराण झाली असताना कोरोनामुळे दुसरा बळी गेल्याने नागरिक पुन्हा हादरले असून भीतीचे वातावरण पसरले आहे. मंगळवारी अथणी तालुक्यातील 32 वर्षीय अभियंत्याचा कोरानामुळे मृत्यू झाल्याचा अहवाल आरोग्य विभागाने जाहीर केला आहे. यापूर्वी हिरेबागेवाडीतील वृद्धेचा बळी गेला होता. त्यापाठोपाठ मंगळवारी आणखी एकाचा बळी गेला आहे. या अभियंत्याच्या अंत्यसंस्कारासाठी 300 हून अधिक लोक गेले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना माघारी पाठवून काही मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कोरोनाबाधितांच्या संख्येत चिंताजनक वाढ होत चालली आहे. मंगळवारी जिल्हय़ात पुन्हा दोन नव्या रुग्णांची भर पडली. याचबरोबर राज्यातही 974 रुग्ण आढळले आहेत. बेळगाव जिल्हय़ात परराज्यातून आलेल्या दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. महाराष्ट्रातून आलेल्या 32 वषीय पुरुष तसेच 25 वषीय महिलेला ही बाधा झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे पुरुष कोणाच्याच संपर्कात न येता त्याला लागण झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. जिल्हय़ाचा आकडा 331 वर पोहोचला. मात्र आतापर्यंत 306 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
परराज्यातून आलेल्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येत आहे. त्याचबरोबर त्यांचे स्वॅबही घेतले जात आहेत. त्यामधील काही जण पॉझिटिव्ह निघत आहेत. त्यामुळे परराज्यांतून आलेल्या व्यक्तींबद्दल जनतेच्या मनात भीती निर्माण होत आहे. महाराष्ट्रातून आलेल्या दोघांना लागण झाल्याचा अहवाल आला आहे. राज्यातही मंगळवारी तब्बल 947 कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 15 हजारावर पोहोचला आहे.