एक हजाराहून अधिक जणांवर नजर, 69 जणांचे अहवाल निगेटिव्ह
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव व रायबाग तालुक्मयातील सात जणांना कोरोनाची लागण झाल्यानंतर ही संख्या वाढणार याची धास्ती वाढली आहे. सध्या आरोग्य विभागाकडून 1 हजार 18 जणांवर नजर ठेवण्यात आली असून तबलिगीमुळे फैलाव झपाटय़ाने वाढत चालल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्हा सर्वेक्षण विभागाने सोमवारी सायंकाळी दिलेल्या माहितीनुसार परदेशातून व परराज्यातून बेळगावला आलेल्या 381 जणांना चौदा दिवसांसाठी होम क्वारंटाईनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला असून 26 जणांना विलगीकरण केंद्रात ठेवून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
408 जणांनी चौदा दिवसांचे तर 203 जणांनी 28 दिवसांचे होम क्वारंटाईन संपविले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. जिल्हय़ातून एकूण 83 जणांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेला पाठविण्यात आले होते. यापैकी 69 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. प्रशासनाला आणखी सात अहवालांची प्रतीक्षा आहे.
25 हून अधिक संशयितांचे स्वॅब प्रयोगशाळेला पाठविले
सोमवारी सर्वेक्षण विभागाने तपासणीसाठी 25 हून अधिक संशयितांचे स्वॅब प्रयोगशाळेला पाठविले असून दोन ते तीन दिवसात त्यांचा अहवालही उपलब्ध होणार आहे. नवी दिल्ली येथील निजामुद्दिन परिसरात तबलिगी जमातच्या मरकजमध्ये झालेल्या धर्मसभेत भाग घेऊन बेळगावला आलेल्या तबलिगींमुळे फैलाव झपाटय़ाने वाढत चालला आहे.
सात जणांची प्रकृती स्थिर
दरम्यान, बिम्सचे वैद्यकीय संचालक डॉ. विनय दास्तीकोप्प यांनी सोमवारी सायंकाळी एक पत्रक प्रसिद्धीला दिले असून कोरोनाची लागण झालेल्या सर्व सात जणांवर विलगीकरण केंद्रात उपचार करण्यात येत असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
जिल्हाधिकारी एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी रविवारी रात्री कुडचीपासून (ता. रायबाग) तीन किलोमीटर अंतरापर्यंत निर्बंधित प्रदेश म्हणून घोषित केला असून ज्या सात जणांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचेही स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेला पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.